श्री रामचंद्र भक्तांवर होणार कथावाचनाचा अमृतवर्षाव
श्री बालाजी वेलफेअर असोसिएशन आणि अन्य सेवाभावी संस्थांच्या वतीने श्री राम कथा वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री बालाजी बागेश्वर धाम पिठाधिश्वर श्री धिरेन्द्र कृष्ण शास्त्री स्वतः त्यांच्या अमोघ वाणीने कथा वाचनाच्या अनुषंगाने रामयुग प्रचिती सादर करणार आहेत.श्री बालाजी वेलफेअर असोसिएशन च्या वतीने दत्तजयंती चे दिवशी मंगळवार दी.२६ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त माहिती दिली.यावेळी अध्यक्षा श्रीमती मंजू गौतम,सचिव सुशील मिश्रा यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला.खजिनदार संजय सिन्हा,राजेश बन्सल, राकेश बन्सल, कन्हैय्या कसेरा, विपुल अगरवाल,जश जी,मोहन जोशी,के डी शुक्ला,बी एल मिश्रा,उपस्थित होते.विशेष उल्लेखनीय म्हणजे राजेंद्र पांडे यांनी पत्रकार परिषद यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी कलश यात्रा द्वारे कथा वाचनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.पनवेलच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील सुप्रसिद्ध रामेश्वर महादेव मंदिरापासून कलश यात्रा निघेल. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी च्या भव्य प्रांगणावर कथा वाचनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.१०,११ व १२ जानेवारी रोजी दररोज संध्याकाळी पूजन,आरती,भजन आणि कथा वाचनाचा कार्यक्रम असणार आहे.
श्री बालाजी बागेश्वर धाम पिठाधिश्वर श्री धिरेन्द्र कृष्ण शास्त्री यांच्या तेजःपुंज आणि भारावून टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी लोटणार आहे.साधारणपणे ८० हजार भक्त रोज येतील असे गृहीत धरून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.स्थानिक प्रशासनाकडून सर्व अनुमत्या प्राप्त करण्यात आल्या असल्याचे आयोजकांनी सांगितले.तसेच आपत्कालीन व्यवस्थापन नियोजन करण्यात आले असून याठिकाणी २ कर्डियाक रुग्णवाहिका,२ साध्या रुग्णवाहिका,निष्णात डॉक्टर्स,परिचारिका,औषधे असे परिपूर्ण वैद्यकीय युनिट तैनात असेल.अग्निशामक यंत्रणा, स्वयंसेवक ताफा,पिण्याचे पाणी,८ शौचालय युनिट भक्तगणांसाठी तयार असणार आहेत.वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून तीन विविध ठिकाणी वाहनतळ नियोजीले आहेत.
आयोजकांनी सर्व भक्तांना या न भूतो न भविष्यती अशा सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.कथा वाचनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बालाजी वेलफेअर असोसिएशन यांच्या सह सत्य संस्कृती चॅरिटेबल ट्रस्ट,पनवेल. विश्वामित्र सत्संग समिती,कामोठे, आंतरराष्ट्रीय हिंदू परीषद मुंबई,विश्व हिंदू परिषद कामोठे शाखा,मारवाडी सेवा संस्थान नवी मुंबई, सिरवी समाज सेवा संस्थान कामोठे,राष्ट्रीय बजरंग दल कोकण शाखा,शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, नवी मुंबई,हिंदू नववर्ष स्वागत समिती कामोठे,राजपुरोहित सेवा मंडळ कामोठे,श्री राम सेना या संघटना अथक परिश्रम घेत आहेत.





Be First to Comment