Press "Enter" to skip to content

सेंट जोसेफ सिबीएससी चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मोठ्या शाळेचे पोकळ वासे

भाजपा अल्पसंख्यांक सेल चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी केली शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार

मोठ्या घराचे पोकळ वासे अशा आशयाची एक म्हण प्रचलित आहे.तोच प्रत्यय मोठे नाव असणाऱ्या खासगी शाळेच्या बाबतीत येत असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. रायन इंटरनॅशनल संचलित सेंट जोसेफ सिबीएससी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज चा थक्क करणारा भोंगळ कारभार एका अपघाताच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. सानिया सय्यद अकबर या १२वी सायन्सच्या विद्यार्थिनीला गंभीर स्वरूपाची जखम झाल्यानंतर तिच्या पालकांना शाळा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय आल्याने या शिक्षण संस्थेच्या क्रियाशीलते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते.

याबाबत सविस्तर हाकिकत अशी की नुकतीच या शाळेतील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सानिया सय्यद अकबर विद्यार्थिनीला शारीरिक शिक्षण प्रकाराचा फारसा अनुभव नसलेल्या एका शिक्षिकेने चक्क फरशीवर रनिंग करण्यास भाग पाडले. सदर विद्यार्थिनीच्या अस्थमा ( दमा) या व्याधीची तिच्या पालकांनी मुख्याध्यापकांना व संबंधित शिक्षकांना यापूर्वी कल्पना दिलेली होती. स्वतः ती विद्यार्थिनी मी अस्थमा पेशंट असून दमछाक होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज करत नाही असे वारंवार समजावून सांगत होती. तिचे कुठलेही न ऐकता धावण्याचा सराव शिक्षकाने सुरूच ठेवला. शिट्ट्यांवर शिट्या मारत तिला धावण्यास भाग पाडले. फरशीवर धावत असताना ही विद्यार्थिनी पडली व तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला त्या ठिकाणी टाके पडल्याचे सूत्रांकडून समजते. हातापायाला व कमरेला प्रचंड मार लागला आहे अशी माहिती मिळाली. विद्यार्थिनीच्या अपघाताबाबत समजल्यानंतर तिचे वडील भाजपा अल्पसंख्यांक सेल चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा कोकण डायरी चे संपादक सय्यद अकबर यांनी त्वरित महाविद्यालयात धाव घेतली.

अस्थमा असून देखील आमच्या मुलीला धावण्यास का सांगितले? भले मोठे मैदान असून देखील फरशी वरती का धावण्याचा सराव करता? असे अडचणीत आणणारे सय्यद अकबर यांनी प्रश्न विचारल्यानंतर शिक्षकांनी कुच्छीत हसत त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी व्हीलचेअर, स्ट्रेचर ,निष्णात कर्मचारी वर्ग अशा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध नसल्याने गोल्डन आवर मॅनेजमेंट कसे करणार? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. यावर देखील शाळा प्रशासनाकडे कुठलेही उत्तर नव्हते.त्यानंतर त्यांनी स्वतः त्या विद्यार्थिनीला खांदा कॉलनी मधील वीर हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार केले.

अपघात झाला त्यावेळी तेथे अन्य कामासाठी आलेल्या पालकांनी देखील त्यांचा उदवेग व्यक्त केला. ही शाळा अव्वाच्या सव्वा फी घेऊन देखील मुलांना सुविधा देत नसल्याचे तेथे जमा पालकांचे म्हणणे होते. स्विमिंग पूल साठी रग्गड फिया हे वसूल करतात परंतु स्विमिंग पूल वर मुलांना नेत नाहीत अशी कॉमन तक्रार ऐकायला मिळाली. तीच कथा प्रयोगशाळांच्या बाबतीत देखील आहे. भरपूर शुल्क आकारून देखील समाधानकारक प्रयोगशाळा व साहित्य उपलब्ध नसल्याचे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. इंग्रजी माध्यमाचा बडेजाव करणाऱ्या या शाळांतील पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण चांगले नसल्याचा पालकांचा दावा आहे. कोरोना विषाणूच्या कालखंडात देखील या शाळांनी सगळ्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या सगळ्याच्या सगळ्या फीज पालकांकडून वसूल केल्या होत्या. मुलीच्या शाळेतील ही वस्तुस्थिती समजल्यानंतर सय्यद अकबर यांनी थेट शिक्षण मंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार करून अपघाताचा किस्सा आणि पालकांच्या तक्रारी कळविल्या आहेत. सदर पत्र व्यवहाराबद्दल त्यांनी पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी आणि खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देखील अवगत केले आहे.

स्वतःला ब्रँड समजणाऱ्या या खाजगी शाळा खरंतर सुविधा प्रदान करण्याच्या बाबतीत अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत. येथील सोयी सुविधा तपासून त्यांना दर्जा प्रदान करणाऱ्या गटशिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत नेमका कुठला सर्वे येथे केला आहे? हा देखील एक संशोधनाचा मुद्दा बनला आहे. शाळेच्या आवारात क्लोज सर्किट कॅमेरे बसविलेले असले तरीदेखील प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. शाळेत प्रवेश करणाऱ्या अथवा शाळेतून बाहेर निघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत हा अत्यंत हलगर्जी प्रकार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

रायन इंटरनॅशनल या गोंडस नावाखाली खांदा कॉलनी मधील ही शाळा व कनिष्ठ महाविद्यालय अत्यंत सुमार दर्जाचे आहे अशी प्रतिक्रिया येथे शिकत असलेल्या मुलांच्या पालकांनी व्यक्त केली. सदर मुलीने तिला अस्थमा असल्यामुळे पाचव्या मजल्यावरील वर्गात जाण्यासाठी लिफ्टचा वापर करावा या स्वरूपाच्या परवानग्या तिच्या वडिलांनी मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांकडून घेतल्या आहेत. असे असले तरी वरचेवर तिला शिक्षकांकडून लिफ्टचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात येतो. अशावेळी तिने स्वतःहून अस्थमा असल्याचे सांगितले तरी देखील शिक्षक तिला जिन्याने वरती पाठवतात. मोठ्या पक्षाचे राज्य पातळीचे पदाधिकारी आणि एक प्रथितयश नागरिक असून देखील सय्यद अकबर यांच्या मुलीला ही वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांच्या मुलांची तर ही शाळा गणना देखील करत नसेल.एकंदरीतच नाव कितीही मोठे असले, शाळा कितीही मोठ्या असल्या तरी देखील ज्ञानदान व विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार यावरच त्याचे मूल्यांकन केले जाते. परंतु या मोठ्या शाळेचे आतले वासे पोकळ असल्याचे दुर्दैवाने दिसून येते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.