डॉक्टर भक्तीकुमार दवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
सिटी बेल ∆ पनवेल ∆
ज्येष्ठ काँग्रेस नेते, आयुर्वेदाचार्य डॉ. भक्ती कुमार दवे यांचा जन्मदिवस जन्मतिथि नुसार दरवर्षी गुरुपौर्णिमेला साजरा करण्यात येतो. या वर्षी सोमवार दिनांक ३ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुस्थानी असणाऱ्या डॉक्टर दवे यांना वंदन करण्यासाठी आणि त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी समाजातील विविध मान्यवरांची मांदियाळी त्यांच्या निवासस्थानी जमली होती.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचे निकटवर्तीय म्हणून सुप्रसिद्ध असणारे डॉक्टर भक्ती कुमार दवे पक्या वैचारिक बैठकीचे नेते आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा केवळ एक पक्ष नसून तो एक सर्व समावेशक समाज निर्मितीचा संस्कार आहे! या सिद्धांतावर त्यांचा परिपूर्ण विश्वास आहे. ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक समस्यांचे,जाणिवांचे यथायोग्य वर्गीकरण करून त्यांचे निराकरण करण्यासाठी सत्तरीत असून सुद्धा हिरीरीने अग्रभागी असणारे डॉक्टर दवे हे समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व आहेत.
पनवेल प्रवासी संघाची मुहूर्तमेढ रोवून त्या माध्यमातून गेली अनेक दशके प्रवाशांचे हर एक प्रश्न धसास लावणारे डॉक्टर दवे यांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील अभ्यास अत्यंत गाढा आहे. पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून अत्यंत यशस्वी पणाने ते जबाबदारी पार पाडत आहेत.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, पनवेल शहर ब्लॉक कमिटीचे सन्माननीय सदस्य अशा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या असून पक्ष संघटन मजबुत करण्याच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भाषांवरती मजबूत पकड, अर्थातच त्यामुळे अस्खलित उच्चारांसह परखड वक्तृत्व यांची जोड असल्याने त्यांची भाषण ऐकणं ही एक प्रकारची पर्वणी असते.
राजकारणातील घडामोडी, समाजकारणातील स्थित्यंतर, कला, क्रीडा, संस्कृती,अध्यात्म या साऱ्या क्षेत्रांच्यात ते अत्यंत अधिकार वाणीने आणि लिलया वावरत असतात. डॉ दवे मितभाषी आणि मृदू स्वभावाचे असले तरीसुद्धा प्रशासकीय सेवेत चुकारगिरी करणाऱ्यांना त्यांच्या आक्रमक अवताराची देखील चांगलीच ओळख आहे. सोमवारी त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आणि अभिष्टचिंतन करण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील, कार्याध्यक्ष अभिजीत पाटील,ज्येष्ठ काँग्रेस नेते जी आर पाटील, ॲड के एस पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित लोखंडे, सरचिटणीस प्रताप गावंड, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पनवेल तालुका सोशल मीडिया समन्वयक गणेश थोरवे, खालापूर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे, प्रमोद गोळे, राकेश जाधव, गिरीश गोळे आदी मान्यवरांच्या सह समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी गर्दी केली होती.
Be First to Comment