Press "Enter" to skip to content

१० जून जागतिक दृष्टीदान दिन

भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीपासून दानाला फार महत्व देण्यात येते. फार पूर्वी धनदान , धान्यदान , अन्नदान , भू दान , गोदान इत्यादी दान करण्यात येत होती आणी ती फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी होती. कालांतराने आरोग्यविषयक शोध लागले आणी अवयवदान ,रक्तदान ,नेत्रदान यांचेही दान होऊ लागले यापैकी अवयवदान आणी नेत्रदान मरणोत्तर करण्यात येते. इतर दान फक्त श्रीमंत व्यक्तीच करत असत परंतु रक्तदान , अवयवदान , नेत्रदान हे श्रीमंतांप्रमाणे गरीबसुध्दासुध्दा करू शकतात. आज आपण नेत्रदानासंदर्भात विचार करणार आहोत.

नेत्रदानाची जुनी परंपरा….. वाल्मीकी रामायणात तर नेत्रदानाने मोक्ष प्राप्त होते असे सांगीतले आहे.

शैब्य: श्येनकपोतीये स्वमांसं पक्षिणे ददौ I

अलर्कश्र्चक्षुषी दत्त्वा जगाम गतिमुत्तमाम II

शैभ्य राजाने बहीरी ससाणा व कबुतरात संघर्ष चालू असताना स्वत:चे मांस ससाण्याला दिले आणि अलर्क राजाने स्वत:चे डोळे दान करुन उत्तम गनीस म्हणजे मोक्षाला प्राप्त झाला. पूर्वी नेत्रहीन मरेपर्यंत अंध रहात होता. ७ डिसेंबर १९०५ रोजी झेकोस्लोवाकिया मध्ये डॉ झिरम यांनी मृत व्यक्तीचा कार्निया अंध व्यक्तीला बसवण्याची शस्त्रक्रिया केली आणी त्याला दृष्टी आली. तेव्हापासून नेत्रदानाचे महत्व वाढले. भारतात अशाप्रकारची शस्त्रक्रिया डॉ धांडा यांनी इंदोर येथे केली होती.

नेत्रदान म्हणजे काय ? …….तर नेत्रदान म्हणजे मृत्युनंतर सहा तासाच्या आत माणसाच्या डोळ्यांमधील काळ्या बुबुळाची वरची १/२ मिलिमीटर जाडीची चकती (कार्निया ) काढून ती अंध व्यक्तीला बसवणे. नेत्रदानात संपूर्ण डोळा काढला जात नाही अथवा नेत्रदान केल्यामुळे चेहेरा विद्रूप होत नाही.

नेत्रदान चळवळ …….

जगातील एकूण दृष्टीहीन व्यक्तींपैकी एकचतुर्थांश व्यक्ती भारतात आहेत.साधारणपणे भारतात २७ दशलक्ष अंधव्यक्ती आहेत. एकट्या महाराष्ट्रात नऊ लाखांपेक्षा जास्त व्यक्ती अंध आहेत. भारतात प्रती हजारी नऊ बालके जन्मजात: अंध असतात. भारतात दरवर्षी साधारणपणे एक कोटी लोक मरण पावतात परंतु अवघे १.५ टक्के व्यक्ती नेत्रदान करतात. श्रीलंका देश लहान असला तरी तेथे शंभर टक्के लोक नेत्रदान करतात. तेथे मानवी डोळे ही राष्ट्रीय संपत्ती आहे अशी मानसिकता असल्याने तसेच सरकारने कायदा केल्याने मृत्युनंतर नेत्रदान केल्याशिवाय अंतिमसंस्कार केले जात नाहीत.त्यामुळे हा देश आपल्या देशातील नेत्रपटलाची गरज भागवून भारतासह सहासष्ट देशांना नेत्रपटल पुरवितो. महाराष्ट्रातील वाशिमजिल्ह्यातील माळेगाव या जेमतेम दिड हजार लोकवस्ती असलेल्या गावाने नेत्रदनाचे महत्व जाणून गावात कुणाचे निधन झाले तर नेत्रदान केल्याशिवाय अंत्यसंस्कारच करायचे नाही असा ठराव केला आहे. असाच संकल्प देशातील सर्व गावांनी केला तर भारतसुध्दा नेत्रदानात जगात अग्रेसर होईल. भारतात सुध्दा नेत्रदानासंदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्नं अनेक वर्षांपासून वरीष्ठ पातळीवरुन करण्यात येत आहे २० ऑगस्ट १९८५ ला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सपत्नीक नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून वाढदिवस साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. तसेच १० जून आंतराष्ट्रीय नेत्रदान दिवस तसेच ८ सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो. १० जून हा आंतराष्ट्रीय नेत्रदान दिवस म्हणून साजरा केला जात असला तरी योगा योगाने भारतीय नामवंत नेत्रविशारद डॉ रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांचा जन्म १० जून १९२६ रोजी झाला आणी निधन १० जून १९७९ रोजी झाले विशेष म्हणजे त्यांनी दहा हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यामुळे भारतात १० जूनला त्यांच्या नावाने नेत्रदान संदर्भात अनेक उपक्रम राबवले जातात.

उघडा डोळे वाचा नीट…..

१० जून रोजी शासनातर्फे अथवा सामाजिक संस्थांतर्फे जे उपक्रम राबवले जातील त्यात सहभागी होऊन शक्य असेल तर नेत्रदान संकल्पपत्र भरावे. "मरावे परी कीर्तीरूपे उरावे" असे म्हणतात परंतु नेत्रदान केले तर दाता म्हणून कीर्तीतर होईलच परंतु दोन व्यक्ती दात्याच्या डोळ्यांमुळे सृष्टी पाहू शकेल म्हणजेच "मरावे परी नेत्ररुपी उरावे " हे प्रत्यक्षात येईल.

दिलीप प्रभाकर गडकरी

कर्जत – रायगड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.