Press "Enter" to skip to content

खिडुकपाडा गावच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अजितदादांना साकडे

प्रभुदास भोईर यांनी दिले अजित दादांना मागण्यांचे निवेदन

सिटी बेल ∆ मुंबई ∆

सत्तरच्या दशकात आलेल्या सिडको ने 95 गावांतील भूसंपादन करत 21व्या शतकातील शहर वसविले. भूसंपादन झालेल्या 95 गावांच्यात खिडुकपाडा असे एक मात्र गाव आहे की ज्याच्या सीमा निश्चित झालेल्या आहेत. परंतु याच सीमा निश्चितीचा येथील ग्रामस्थांना फार मोठा फटका बसला आहे. कागदोपत्रि या गावच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर असला तरी देखील आजपर्यंत यातला एक नवा पैसा देखील ग्रामस्थांच्या सार्वजनिक सोयी सुविधांवर खर्च झालेला नाही. ग्रामस्थांना पायाभूत सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांनी गेली दोन वर्ष प्रचंड पाठपुरावा करत सिडकोचा पिच्छा पुरविला आहे.

नुकतेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड यांच्या पुढाकाराने सिडकोचे गेट बंद आंदोलनाचा पुकार दिल्यानंतर सिडको शिष्टमंडळांनी येऊन येथील समस्यांची पाहणी केली. असे असले तरी अत्यंत सुस्त गतीने काम करणाऱ्या सिडकोला लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यासाठी प्रभुदास भोईर जंग जंग पछाडत आहेत. याच प्रयत्नात आज दिनांक 18 एप्रिल रोजी प्रभुदास भोईर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली.

अजित दादा पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री असतानाच्या कालखंडात सिडकोमध्ये मॅरेथॉन बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांचे सगळे प्रश्न ऐकून घेतले होते. त्यामुळे अजित दादाच आमच्या ग्रामस्थांची समस्या सोडवू शकतात असे प्रभुदास भोईर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सिडको ने भूमी अधिग्रहण केल्यानंतर येथील प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के परताव्याचे सूत्र आणि गावासाठी सार्वजनिक सोयीसुविधा यांची तरतूद असणारा शासकीय निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी पारित केला होता. परंतु प्रत्यक्षात तो निधी ग्रामस्थांना देईपर्यंत अजूनही आम्ही प्रतीक्षेत आहोत याची जाणीव आम्ही अजितदादांना करून दिली. तसेच आमच्या गावालागत असणाऱ्या लोखंड व पोलाद बाजार समितीने आमच्या गावासाठी करायच्या कामांचे बाबत देखील दादांना अवगत केले.

यावेळी प्रभुदास भोईर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनचे राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब बोरकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड, दीपक गोंधळी, भावेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रभुदास भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजितदादांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या समस्यांचे कथन केले. अजितदादांनी तातडीने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना दूरध्वनीवरून शक्य तितक्या लवकर बैठक लावून प्रत्येक विषय मार्गी लावण्याबद्दल सूचना दिल्या. तसेच माथाडी भवन निर्मिती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हस्तांतरण, ग्रामस्थांसाठी रस्ते गटारे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी या सुविधा त्वरित सुरू करून मला त्याचे अपडेट द्या असे दादांनी निर्देश दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.