टाटांची टायटल स्पॉन्सरशिप आणि अंबानींच्या जिओचे नेटवर्क अशा शंभर टक्के देशी कॉम्बिनेशन मध्ये इंडियन प्रीमियर लीग 2023 ची दणक्यात सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा हा सोळावा हंगाम आहे. यंदाच्या हंगामात सुद्धा दहा संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. कोरोना निर्बंध आणि त्यामुळे असणारी बायोबब्बलची ब्याद मिटली असल्या कारणामुळे “होम आणि अवे” अशा जुन्या फॉरमॅटमध्ये पुन्हा एकदा आयपीएल आपल्या समोर येते आहे. कुठल्याही क्रिकेट संघाचे सुकाणू त्याच्या कर्णधाराच्या हातात असते. त्यानिमित्ताने यंदाच्या हंगामातील कर्णधारांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मागच्या हंगामाचे विजेते ठरलेल्या गुजरात टायटन च्या कर्णधार पदाची धुरा पुन्हा एकदा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. पदार्पणाच्या वर्षातच विजेतेपदाचा किताब मिळवून देणारा कप्तान म्हणून त्यानी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कितीही खडतर परिस्थिती असली तरी सुद्धा शांत डोक्याने खेळत समोरच्याच्या घशातून मॅच काढणारा फलंदाज म्हणून हार्दिक ची ओळख आपल्या सगळ्यांनाच आहे. त्याची मध्यम द्रुतगती गोलंदाजीसुद्धा ऐनवेळी विकेट मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा त्याच्याकडे आल्यानंतर तो कर्णधार म्हणून अधिकाधिक प्रगल्भ होत चाललाय. या सगळ्याचा त्याला निश्चितच फायदा होणार आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्स यांना सहज हरवत त्यानी या सगळ्याची चुणूक दाखवून दिली आहे.
तब्बल चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स साठी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी हे त्यांचे बलस्थान आहे. स्टम्सच्या पाठीमागून महेंद्रसिंग धोनीने गेम नियंत्रित करणे हे संघाला विजयाची संधी जास्त असल्याचे लक्षण असते. परिस्थितीनुरूप गोलंदाजांचा वापर कदाचित महेंद्रसिंग धोनी ज्या कल्पकतेने करतो तसा तो जगातील अन्य कुठलाही कर्णधार करू शकत नसेल. अनेक तज्ञांनी हा माहीचा शेवटचा आयपीएल हंगाम असेल असे भाकीत वर्तवले आहे. माहीची प्रॅक्टिस सेशन्स आणि पहिली मॅच बघितल्यानंतर हे सगळे तज्ञ तोंडावर आपटणार! यात जरा देखील दुमत नाही.
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधार पदाची धुरा डेव्हिड वॉर्नर या ऑस्ट्रेलियाच्या तडाखे बंद फलंदाजावर असेल. मुळात डेव्हिड बॉर्नर याला मी शब्दशः “एक्सीडेंटल कॅप्टन” असंच म्हणेन. दिल्ली कॅपिटल्स साठी बलस्थान असणारा त्यांचा कर्णधार अर्थातच रिषभ पंत हा अपघातामुळे जायबंदी आहे. ऋषभ पंत पहिल्या अकरात नसणे हा दिल्लीसाठी सगळ्यात मोठा धक्का असेल. पंत सुद्धा महेंद्रसिंग धोनीच्या पावलावर पाऊल टाकत स्टंप पाठीमागून सामना नियंत्रित करण्यात हळूहळू प्रगल्भ होत असताना नेमका अपघाताने त्याला दणका दिला. डेव्हिड वॉर्नर याची कॅप्टनशिप मुळातच वादग्रस्त आहे. यापूर्वीच्या हंगामात पराभवाने पिच्छा पुरवला असल्याकारणाने अर्ध्या हंगामातच त्याला कर्णधार पदावरून दूर करावे लागलं होतं. अर्थात तेव्हा तो सनरायझर्स हैदराबाद या संघाचे कर्णधारपद सांभाळत होता.
कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी स्टायलिश बॅट्समन श्रेयस अय्यरकडे असेल. श्रेयस अय्यर अजूनही इंजुरी सोबत झगडतो आहे. त्यामुळे सुरुवातीचे काही सामने तो उपलब्ध नसेल अशा परिस्थितीत नितीश राणा कॅप्टनशिप सांभाळू शकतो. श्रेयस अय्यरने यापूर्वी दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे कॅप्टन पद भूषविले होतं. ती जबाबदारी त्यानी चांगलीच पार पाडली होती. त्याचा अनुभव त्याला केकेआर च्या कॅप्टनशिप साठी फायदेशीर ठरेल. कॅप्टनशिपचा परिणाम श्रेयस अय्यर त्याच्या फलंदाजीवर होऊ देत नाही हे त्याचे बलस्थान आहे.
विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप रोहित शर्मा कडे असेल. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहित शर्मा या स्पर्धेत काहीसा ओव्हर एक्झॉस्टेड वाटतो. फिटनेस राखण्यासाठी रोहित शर्मा नेहमीच संघर्ष करत असतो. पुढच्या वर्षी वर्ल्ड कप खेळायचा आहे, त्यामुळे या आयपीएल स्पर्धेत तो स्वतःचा फिटनेस कसा राखतो हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.
पंजाब किंग्स या संघाचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. कितीही अप्रतिम खेळाडूंचा संच लाभला तरी देखील पंजाब किंग्स विजेतेपदावर दावा सांगण्यात नेहमीच कमकुवत ठरतात. कणखर नेतृत्वाचा अभाव हे देखील त्याचे कारण असू शकते. मागच्या हंगामापर्यंत मयंक अगरवाल या संघाचे कर्णधार पद सांभाळत होता. सोळाव्या हंगामात डावखुरा तडाखे बंद सलामी फलंदाज शिखर धवन कॅप्टनशिप सांभाळेल. शिखर धवन याला भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याचा विनिंग रेशोदेखील अफलातून आहे. पंजाब किंग या संघाला आवश्यक असणाऱ्या कणखर नेतृत्वाची कमतरता शिखर धवन भरून काढू शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु संघाच्या कॅप्टन पदी साऊथ आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसिस विराजमान होणार आहे. आयपीएल ट्रॉफी आपल्या शोकेसमध्ये घेऊन जाण्यासाठी तडफडत असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स संघासाठी हे डिसिजन ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकते. मुळात फॅफ ड्यू प्लेसिस याला कर्णधार पदाचा दांडगा अनुभव आहे. भारतीय वातावरणात आणि भारतीय खेळाडूंच्या तो चांगलाच रमलेला आहे. सगळ्यात विशेष म्हणजे आयपीएल स्पर्धांच्यात कर्णधार पद आणि तडाखेबंद खेळाडू या दोन भूमिकांच्यात विराट कोहली नेहमीच संभ्रमित असतो. त्याच्यावरची कर्णधार पदाची जबाबदारी हटवून जर फक्त एक बॅटिंग जायंट म्हणून त्याला जबाबदारी दिली तर तो टूर्नामेंट विनिंग निर्णय असेल. हाच निर्णय टीम मॅनेजमेंट घेतलाय तो योग्य आहे की अयोग्य हे लवकरच समजेल.पण त्यांच्या या हंगामाची सुरुवात मात्र दडक्यात झाली आहे. ड्युप्लेसी आणि विराट च्या झंजावाती ओपनिंग समोर मुंबई पाल्या पाचोळ्या सारखी उडाली.मुंबई इंडियन चा संघ अगदी क्लब लेवल चा संघ वाटला.
लखनऊ सुपर जायंट्स संघ त्यांच्या दुसऱ्या हंगामात कर्णधार के एल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळेल. पहिल्याच हंगामात पॉईंट टेबल च्या तिसऱ्या स्थानी विराजमान असण्याचा बहुमान या संघाने पटकावला होता. पण स्वतः के एल राहुल याचा फॉर्म पाहता तो धावांसाठी झगडतो आहे. वर्ल्ड कप स्क्वाड मध्ये सिलेक्ट होण्यासाठी त्याला भरीव काहीतरी करून दाखवावे लागेल. नाही म्हणायला ऑस्ट्रेलिया सोबत ओडिआय सिरीज मध्ये झळकावलेले अर्धशतक त्याच्या पुण्याईला तेवढे शिल्लक आहे. मागच्या हंगामात तडाखे बंद फलंदाजी करत तितकेच कणखर नेतृत्व त्यानी करून दाखवले होते. यावेळी मात्र त्याचा फॉर्म त्याच्यापाशी नसणे हे त्याचे कमकुवत दुवा बनते. के एल राहुल तगड्या संघांसमोर नांगी टाकतो आणि दुय्यम संघांसमोर पोतडी भरून धावा काढतो! असे त्याच्याबद्दलचे मत बदलण्याचा दबाव देखील त्याच्यावरती सातत्याने असेल.
राजस्थान रॉयल्स संघाच्या कप्तानपदी संजू सॅमसंग असणार आहे. अत्यंत गुणवान खेळाडू असून सुद्धा सातत्याने संधी मिळत नसल्यामुळे भारतीय संघाच्या बाहेर तो आहे. तडाखे बंद सलामी फलंदाज जर विकेटकीपर असेल तर त्या संघाला एक अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळविण्याची मुभा प्राप्त होते. पण अशावेळी आपल्याकडे फक्त रिषभ पंत आणि ईशांत किशन यांचाच विचार केला जातो. माझ्या मताप्रमाणे संजू सॅमसंग हा क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये चपखल बसणारा विकेटकीपर फलंदाज आहे. असे असले तरी आत्ताच्या घडीला सगळ्यात यशस्वी वाईट बॉल कॅप्टन म्हणून ज्याची संपूर्ण जग दखल घेत आहे अशा जॉस बटलर कडे राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व दिल्यास ते अधिक प्रभावी ठरेल.
सनरायझर्स हैदराबाद संघाने साउथ आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ऐदिन मार्क्रम कडे कर्णधार पद देऊन पाहिले आहे. एकंदरीतच या संघाची या हंगामात वाटचाल कशी असणार आहे याची चुणूक काल संध्याकाळी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात आलीच. कितीही प्रतिभावान आणि गुणवान खेळाडू असले तरी सुद्धा त्यांच्यातील कौशल्याचा वापर करून घेण्याचे कसब असणारा कर्णधार नसेल तर तो संघ ढेपाळतो. सनरायझर्स हैदराबाद चे नेमके तसेच होते आहे.
कॅप्टन कॅप्टन काय म्हणता…??
More from UncategorizedMore posts in Uncategorized »
Be First to Comment