सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
नवीन पनवेल मध्ये काही बेकायदेशिर मच्छी-मटण विक्रेते फूटपाथवर बसून विक्री करत असून याचा नाहक त्रास नियमित व नियमाने मार्केटमध्ये बसून मच्छी-मटण विक्री करणाऱ्यांना होत आहे. त्यामुळे बाहेर फूटपाथवर बसून मच्छी-मटण विक्री करण्यांना मज्जाव करावा तसेच त्यांच्यासाठी मार्केटमध्ये बसण्यासाठी सोय करुन दयावी अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात मनोज भुजबळ यांनी म्हटले आहे कि, सिडकोने नविन पनवेलची रचना करताना कोणत्याही मुलभूत सोयी सुविधांचा विचार न करता नविन पनवेलची उभारणी केली. त्यामुळे प्रत्येक सेक्टरमध्ये सार्वजनिक भाजीमार्केट, फळमार्केट, फूलमार्केट, मच्छीमार्केट व मटण मार्केटची सुनियोजित रचना केलेली नाही. यामुळे परिसरातील सर्व रस्त्यांचे फूटपाथ फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत. नवीन पनवेल सेक्टर 12 येथे मच्छी मार्केट असून तेथे कायदयाने पालन करुन मच्छी विक्रेते बसत आहेत.
परंतु बेकायदेशिर फूटपाथवर बसून मच्छी विक्री करणाऱ्यांमुळे नियमित व नियमाने मार्केटमध्ये बसून मच्छी विक्री करणाऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच मच्छी मार्केटच्या शेजारी सिडकोने मटण मार्केट बांधलेले आहे मात्र सध्या हे मार्केट बंद पडून असून तेथे दलदल माजलेली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने संपूर्ण नविन पनवेल मधील मटण-चिकण व मच्छी विक्रेते यांना एकाच छताखाली बसण्याची सोय उपलब्ध करून दयावी जेणेकडून शहराचे विद्रुपीकरण थांबेल व नागरिकांचे गैरसोय होणार नाही.
Be First to Comment