नंदुरबार शहरात 14 दिवसात विनामास्क फिरणाऱ्या 2000 नागरिकांवर कारवाई
सिटी बेल | रामकृष्ण पाटील | नंदुरबार |
जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालीये. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कोव्हिड अनुरुप लावलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कारवाई करण्यात आली
1 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर नाकाबंदी करत जिल्ह्यातील 12 पोलीस स्टेशनअंतर्गत मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करुन विनामास्क फिरणाऱ्या 2 हजार नागरिकांवर कारवाई केली. यातून गेल्या 14 दिवसात 4 लाख 13 हजार 400 रुपये दंड वसूल केला आहे.
जिल्ह्यातील रेस्टॉरंट, उपहारगृहे आणि इतर आस्थापनांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीत कोव्हिड अनुरुप नियमांचे पालन न केल्याचे आढळून आले. जिल्ह्यातील 12 पोलीस स्टेशनअंतर्गत 77 आस्थापनांवर कारवाई करून 124 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोव्हिड संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. विनामास्क फिरणारे नागरिक आणि पाच पेक्षा जास्त गटाने उपस्थिती लावणारे नागरिक आणि आस्थापनाविरुद्ध कडक कारवाई सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास नागरिकांना चारित्र्य पडताळणी दाखला मिळणेबाबत अडचण निर्माण होऊ शकते.
त्यामुळे नागरिकांनी covid-19 अनुरुप शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करुन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.








Be First to Comment