परराज्यात जाणार्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर महानगरपालीकेच्या खर्चात केली जात आहे आर टी पी सी आर चाचणी
पनवेल महानगरपालीकेला नक्की चिंता कोणाची ? प्रवाशांची की टेस्ट करण्याचे कंत्राट दिलेल्या लॅब ची ?
पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आटोक्यात आलेली कोरोना रुणसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.परंतु ही रुग्णसंख्या खरंच वाढत आहे की मुद्दाम वाढविली जात आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
याच कारण पनवेल रेल्वे स्थानकावर महानगरपालिकेतर्फे पनवेलहून परराज्यात जाणार्या प्रवाशांची चक्क आर टी पी सी आर चाचणी करण्यात येत आहे. एकवेळ ऍंटीजन चाचणी करत असते तर जो प्रवासी प्रवास करीत आहे तो कोरोना रुग्ण आहे की नाही ते ताबडतोब समजले असते.त्यामुळे पाॅझीटिव्ह प्रवाश्याकडून इतर प्रवाशांना होणारा धोका त्याला प्रवास करण्यास मनाई करुन टाळता येऊ शकतो. त्याचप्रमाणे अशा प्रवाशांवर ताबडतोब उपचार सुरू केले जाऊ शकतात.
मात्र तसे न करता परराज्यात जाणार्या प्रवाशांची चक्क आर टी पी सी आर चाचणी करण्यात येत आहे.रेल्वे स्थानकावर या प्रवाशांचे स्वॅब घेऊन त्यांना प्रवास करण्यास जाऊ देण्यात येते.आता ज्या प्रवाशांचे स्वॅब घेण्यात येते त्यांना चाचणी चा रिपोर्ट तीन दिवसांत त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे.मग या चाचणी चा उपयोग काय ? कारण यात जर कोणी कोरोना रुग्ण आढळून आला तर तो दुसऱ्या राज्यात पोहचला देखील असणार आहे.अशावेळी पनवेल महानगरपालिका काय करणार ? स्वॅब घेताना या प्रवाशांचे फक्त नाव आणि मोबाईल नंबर घेण्यात येते.त्याचा पनवेल चा पत्ता किंवा कुठे जात आहे त्याचा पत्ता घेतला जात नाही.
त्याचप्रमाणे या प्रवाशांना आलेला रिपोर्ट मोबाईलवर पाठवलेल्या लिंक वर जाऊन पहावा लागतो आहे.मग ज्यांच्या कडे स्मार्ट फोन नाही त्यांना रिपोर्ट कसा समजणारं ? मुळात तो प्रवाशी त्यांच्या इच्छीत स्थळी पोचल्यावर तो रिपोर्ट का बघेल ?
मग अशा वेळी प्रश्न पडतो की महाराष्ट्र सरकारने राज्यात बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना आर टी पी सी आर चाचणी सक्तीची केली असताना पनवेल महानगरपालिका ज्या राज्यात जाण्यासाठी आर टी पी सी आर चाचणी सक्तीची नाही त्यांची स्व खर्चाने चाचणी का करत आहे ?
आता जर या स्वॅब घेतलेल्या प्रवशांमधुन कोणी पाॅझीटीव्ह रुग्ण आढलला तरी त्याची गणती पनवेलच्या रुग्ण संख्येत होणार आहे.परंतु तो रुग्ण त्याच्या राज्यात असणार आहे.याचा साधा विचार देखील महानगरपालीकेच्या हुश्शार अधिकार्यांनी कसा केला नाही ?
त्यामुळे अशाप्रकारे महानगरपालीकेच्या तिजोरीवर भार देऊन रुग्ण संख्या वाढवण्यामागे कोरोना टेस्ट करणार्या पॅथाॅलाॅजी लॅब चे उखळ पांढरं करून स्वतः चे देखील हात ओले करण्याचा मानस तर नव्हे ? याचा विचार महापौर, नगरसेवक तसेच सर्वसामान्य नागरीकांनी सुध्दा करायलाचं हवा.








Be First to Comment