Press "Enter" to skip to content

‘फक्त दिबा दुसरे नाव दिले तर १९८४ च्या पेक्षा मोठा क्रांती लढा’

दिबांच्या नावासाठी स्वातंत्र्यदिनाच्या डेडलाईन ; अन्यथा विमानतळाचे सर्व कामे बंद पाडणार

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी |

१५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, अन्यथा दुसऱ्या दिवसापासून विमानतळाची सर्व कामे बंद पाडण्यात येऊन क्रांती घडवली जाईल, असा इशारा लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने आज (गुरुवार, दि. २४ जून) लाखो आंदोलकांच्या साक्षीने सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, या मागणीसाठी बेलापूर येथे सिडकोवर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व जाती धर्माचे समाज, विविध राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त नागरिक आंदोलनकर्त्यांनी सहभागी घेऊन ‘जय दिबा’ असा एल्गार केला. आणि ‘फक्त दिबा दुसरे नाव दिले तर १९८४ च्या पेक्षा मोठा क्रांती लढा होईल, असा खणखणीत आवाजही दिला. यावेळी दिबासाहेबांच्या जयकाराच्या गगनभेदी घोषणा देत संपूर्ण आसमंत दणाणून सोडला होता.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी २००८ सालापासून होत आहे. मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी व भूमिपुत्र जनतेच्या भावना जाणून न घेता मागणी केली आणि कोरोनाची भयावह परिस्थिती असतानाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोने धिसाडघाईने केला. त्यामुळे नामकरणाचा वाद निर्माण झाला आणि तो चिघळलाही. या प्रकल्पाला लोकनेते दि. बा पाटील असे नामकरण करण्याचा आग्रह भूमिपुत्रांनी स्थानिकांनी धरलेला आहे. ठाकरे सरकारने हेकेगिरी केल्याने भूमिपुत्रांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आणि त्याचे पडसाद या आंदोलनात दिसून आले. अनेकांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेचा निषेधही यावेळी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी २००८ पासून सुरु आहे. असे असतानाही त्याचा कुठलाही विचार न करता मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता आपलाच हट्ट पुढेकेला.त्यावेळीझालेल्या बैठकीतून एकदा उठूनही गेले. काहीही झाले तरी ‘दिबां’च्या नावासाठी आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केला. कृती समितीच्या शिष्टमंडळाचे ऐकून न घेता, चर्चा न करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीतून निघून गेल्याने सर्वपक्षीय कृती समितीने २४ जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार केला होता आणि त्या अनुषंगाने आजचे आंदोलन लाखो आंदोलकांच्या सहभागाने अती भव्य दिव्य झाले. दरम्यान शिष्टमंडळाने सिडको व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण संदर्भात केलेला ठराव रद्द करावा. आणि लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नवीन ठराव करावा अशा प्रकारची मागणी शिष्टमंडळाने सिडकोकडे केली.


भूतो न भविष्यतो ऐतिहासिक आंदोलनाचे झाले लाखो साक्षीदार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे अशी आग्रही आणि ठाम भूमिका मांडत आजचा सिडको घेराव आंदोलन ‘भूतो न भविष्यतो’ ठरला. या आंदोलनात एक लाखहुन अधिक आंदोलकांनी सहभाग घेत आंदोलनाचे प्रत्यक्ष साक्षीदार झाले.
अहिंसा, शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पार पडले असले तरी या आंदोलनांची ताकद एवढी प्रचंड होती कि, जवळपास पाच हजारहून अधिक पोलिसांची फौज आंदोलन परिसरात तैनात करण्यात आली होती.
या आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार व माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, माजी मंत्री हुसेन दलवाई, माजी मंत्री रवीशेठ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार योगेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, पनवेल महानगरपालिकेचे महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाबराव वझे, कॉ. भूषण पाटील, म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जे. डी. तांडेल, दशरथ भगत, मयुरेश कोटकर, यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्ष, संघटना, वारकरी सांप्रदाय, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक रायगड, नवी मुंबई, पालघर, ठाणे, शहापूर, नाशिक, कल्याण, डोंबिवली आदी भागातून लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही दिबांच्या नावासाठी जाहीर पाठिंबा दिला असून तसे पाठिंबा पत्र आंदोलनात देण्यात आले.

कशी सत्तेने थट्टा मांडली
महाविकास आघाडीतील स्थानिक पुढाऱयांनी सत्तेपुढे अक्षरशः नांगी टाकली. त्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त, स्थानिक, भूमिपुत्रांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत, त्यामुळे ‘कशी सत्तेने थट्टा मांडली’ अशी परिस्थती महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांची झाली आणि याची चर्चा रायगडपासून मुंबईपर्यंत रंगू लागली आहे.


लोकनेते दिबासाहेबांसोबत पंच हुतात्मे कधीच माफ करणार नाहीत…
‘हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते आणि वाया जाऊन द्यायचे नसते’… हा दिबासाहेबांचा एल्गार आहे. आणि या यल्गारच्या माध्यमातून लढे संघर्ष सुरु राहिले. दिबासाहेबांचे लढे, आंदोलने आणि संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिले. त्यांच्या संघर्षांतून साडेबारा टक्केचा, साडे बावीस टक्क्यांचा निर्णय प्रस्थापित झाला, हि फक्त समाजासाठी नाही तर संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. जे कुणालाही शक्य झाले नाही ते आपल्या नेत्याने करून दाखवले शेवटच्या श्वासापर्यंत ते लढ्यात उतरले अशा दिबासाहेबांच्या नावाला विरोध करणे म्हणजेच भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या देवाला नाकारणे आहे आणि ती विरोधाची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली. त्यामुळे लोकनेते दिबासाहेबांसोबत पंच हुतात्मे त्यांना कधीच माफ करणार नाहीत, अशी ज्वलंत प्रतिक्रिया आंदोलकांकडून मिळत होती.

धमकी अक्षरशः पोकळ ठरली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलन कराल, तर शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, अशी धमकी दिली होती. त्यांच्या आदेशाने स्थानिक शिवसेना पुढाऱ्यांनी स्वतःची छाती बडवून घेतली होती आणि २४ जूनला आम्ही पण रस्त्यावर येणार अशी गर्जना केली होती. मात्र त्यांची हि धमकी अक्षरशः पोकळ ठरली.

भूमिपुत्रांच्या जागेत घुसखोरी कशाला

नवी मुंबई विमानतळ पूर्णत्वास यायला अद्याप किमान चार वर्षांचा कालावधी असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करत पनवेल, उरण, नवी मुंबई, ठाणे, पालघर, मुंबईत वादाची ठिणगी टाकली. मुळातच ती अत्यंत चुकीची होती कारण विमानतळाचे काम पूर्ण झाले नाही. वास्तविक शिवसैनिक म्हणून भूमिका घेण्यापेक्षा ना. शिंदे यांनी राज्याचे एक जबाबदार मंत्री म्हणून स्थानिक, प्रकल्पग्रस्त तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न करता वरिष्ठ नेत्यांची मर्जी राखण्यासाठी केलेला एक अट्टाहास असल्याचे चित्र आता जनतेसमोर स्पष्ट झाले आहे. मुळातच विमानतळाचे काम पूर्ण झाले नाही, त्याचवेळी विमानतळाबाधितांचे अनेक प्रश्न सोडविण्याचे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या भूमिकेतून काम सुरु असताना नामकरणाचा मुद्दा हा विषयच नव्हता परंतु राजकारणात कुरापती काढणं काहींना सहज जमते त्या अनुषंगाने हे प्रकरण घडवून आणले. दुसरीकडे सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे मग नामदार एकनाथ शिंदे यांनी त्या विमानतळाला स्व. बाळासाहेबांचे नाव देण्याचा आग्रह का धरला नाही?, औरंगाबादचे संभाजीनगर अद्याप करता येत नाही मग नवी भूमिपुत्रांच्या जागेत का घुसखोरी करता असा सवालही यावेळी या आंदोलनातून उपस्थित झाला आहे.

आंदोलनात वटपौर्णिमा
ज्येष्ठ आणि तरुणाची फौज या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडत असताना महिलाही मागे राहिल्या नाहीत. २४ जूनला योगायोगाने याच दिवशी वटपौर्णिमा होती. असे असले तरी भूमिपुत्र सावित्रींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत यंदाची वटपौर्णिमा या आंदोलनात साजरी केली.

तर १९८४ च्या पेक्षा मोठी क्रांती घडेल – दशरथदादा पाटील
भूमिपुत्रांसाठी संपूर्ण आयुष्य दिबांनी वेचले. १९८४ सालचा लढा असो किंवा इतर लढे. अशा अनेक लढ्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. १९५८ साली कुळकायदा पॅटर्न मुळे देशात न्याय प्रस्थापित झाला त्यामुळे दिबा देशाचे नेते होते. दिबांच्या नेतृत्वाखाली १९८४ च्या लढ्यात मी लोकनेते रामशेठ ठाकूर, द्त्तूशेठ पाटील असे अनेक जणांनी काम केले त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा, वैचारिक प्रगल्भता, संपूर्ण आयुष्य त्यांनी बहुजन समाजासाठी खर्च केले आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिबांचेच नाव देण्यात यावे दुसरे नाव दिले तर १९८४ च्या पेक्षा मोठी क्रांती घडेल.

उत्साह कायम ठेवा सरकारला दिबासाहेबांचे नाव दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही- लोकनेते रामशेठ ठाकूर
वंदनीय दिबासाहेब यांनी सर्व समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. त्यांच्या नावासाठी सर्व समाज एकवटला आहे. ९९ टक्के समाज आणि विविध पक्ष, संघटना, संस्था, सांप्रदाय दिबांच्या नावासाठी आग्रही आहे. ७० पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे. हा उत्साह कायम ठेवा सरकारला दिबासाहेबांचे नाव दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही. सिडकोने ठराव बदलून दिबासाहेबांच्या नावाचा करावा आणि राज्य सरकारला पाठवावा.

भूमिपुत्रांबद्दल मुख्यमंत्र्यांना जराही आपुलकी नाही – माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण
लोकनेते दि. बा. पाटील यांनी त्यावेळी सरकारच्या विरोधात आंदोलन करून भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिले. माझी जन्मभूमी मुंबई असली तरी माझी कर्मभूमी कोकण आहे, येथील प्रत्येक माणूस दिबांचा आहे. भूमिपुत्रांबद्दल मुख्यमंत्र्यांना जराही आपुलकी नाही. दिबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिल्याशिवाय भूमिपुत्र गप्प बसणार नाही.

भूमिपुत्रांना डिवचू नका तो बंदूकीलाही घाबरत नाही – काँग्रेसनेते हुसेन दलवाई
बाळासाहेब ठाकरे नेहमी भूमिपुत्रांच्या बाजूने उभे राहिले, स्वर्गात त्यांनाही दिबासाहेबांचे नाव मान्य असेल ते उद्धव ठाकरेंच्या स्वप्नात येतील आणि त्यांना सांगायचे ते सांगतीलच. दिबा फक्त भूमिपुत्रांचे विचार करायचे. विमानतळ होत आहे हि भूमिपुत्रांची मेहरबानी आहे. त्यामुळे भूमिपुत्राला विसरू नका आणि हे पाप करू नका. बाळासाहेब, बॅ . अंतुले यांचे स्मारक भव्य दिव्य व्हावे पण नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव मिळावे. येथील भूमिपुत्र शांत आहे तर तुम्ही त्याला डिवचले तर बंदूकीलाही घाबरत नाही. सन्मानाने चर्चा करा मार्ग काढा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात एकवटली आहे. आणि या लढ्यात दशरथ दादांना सहभागी करून या खऱ्या लढाऊ वाघाला जिवंत केले आहे.

नुसती हाक दिली आणि दिबांसाठी जनसागर आला – आमदार प्रशांत ठाकूर
विमानतळाचे काम पूर्ण नसतानाही आणि कोविडचे भयंकर संकट असतानाही मागणी आणि तात्काळ ठराव भूमिपुत्रांच्या माथी मारण्याचे प्रयोजन राज्य सरकारने केले. दिबासाहेबांचे नाव डावलून भूमिपुत्रांना डिवचण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. २००८ सालापासून दिबांच्या नावाची मागणी असतानाही ठाकरे सरकारने प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी जो पर्यंत दिबासाहेबांचे नाव विमातळाला मिळत नाही तो पर्यंत हा लढा आपल्याला सुरूच ठेवून जिंकायचा आहे. दिबासाहेबांची आण ठेवून रायगड पासून मुंबई अगदी नाशिक पर्यंतची दिबासमर्थक या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे नुसती हाक दिली आणि दिबांच्या नावासाठी जनसागर एकवटला आहे.

सरकार उद्या असेल का नसेल म्हणून त्या भितीपोटी ठराव- आमदार महेश बालदी
महाविकास आघाडीचे हे सरकार उद्या असेल का नसेल हे त्यांना माहित नाही म्हणून त्या भितीपोटी ठराव करून नाव देण्याचा घाट घातला आहे. वाढीव गावठाण पक्के करण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून मागणी आणि संघर्ष सुरु आहे पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या संदर्भात मागणी पत्र देऊन प्रकल्पग्रस्तांना लॉलीपॉप देण्याचा ढोंगी प्रयत्न सुरु केला आहे, त्याला प्रकल्पग्रस्त भुलणार नाही. राज्यात अनेक प्रकल्प आहेत त्यातील दहा प्रकल्पांना बाळासाहेबांचे नाव द्या पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दि. बा. पाटील यांचेच नाव दिले पाहिजे.

आम्ही आमच्या हक्क मागत आहोत भीक मागत नाही- आमदार मंदा म्हात्रे
प्रकल्पसाठी आणि देशाच्या विकासासाठी आमच्या शेतकऱ्यांनी पिकत्या जमिनी दिल्या आहेत. आमच्या घराच्या भिंती, गाड्या दिबासाहेबांच्या आशीर्वादामुळे आहेत, त्यामुळे विरोधकांनी राजकारण करू नये. दिबांचे कार्य महान आहे. त्यामुळे विधिमंडळात २०१९ मध्येच विमानतळाला त्यांचे नाव द्यावे हि मागणी केली आहे. आम्ही आमच्या हक्क मागत आहोत भीक मागत नाही.

मुख्यमंत्री महोदय खालच्या लोकांचे ऐकून वागाल तर आंदोलन करायला तुम्हाला भाड्याने लोकं आणावी लागतील – आमदार गणपत गायकवाड
दिबांच्या नावाची मागणी होत असताना अचानक ठिणगी टाकण्याचे काम झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीची हुकूमशाही सुरु झाली आहे. त्यामुळे आता मुलाच्या किंवा मुलाच्या लग्नात त्यांच्या मुलांची नाव ठेवण्याची संस्कृती येईल. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्ही आंदोलन केले तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील अशी धमकी देत सुटले. असे असतात का मुख्यमंत्री? हे मुख्यमंत्री आहेत ना असे केले तर कसे राज्य चालवणार. भूमिपुत्र पण शिवसैनिक आहेत हे लक्षात असू द्या. नाही तर ठाणे रायगडमध्ये शिवसेना उरणार नाही. मुख्यमंत्री महोदय खालच्या लोकांचे ऐकून वागाल तर आंदोलन करायला तुम्हाला भाड्याने लोकं आणावी लागतील .

भूमिपुत्र कागदावरचे नाही तर खरे वाघ आहेत हे लक्षात ठेवा- संतोष केणे
भूमिपुत्रांनी या आंदोलनातून ताकद दाखवून दिली आहे. नामदार एकनाथ शिंदे पालकमंत्री म्हणून तुम्हाला जाग आली नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विसर पडला का? ठाण्याचे वाघ समजत असाल पण भूमिपुत्र कागदावरचे नाही तर खरे वाघ आहेत हे लक्षात ठेवा.

डोक्यावर बसवले तेच तुम्हाला पायदळी तुडवतील – ह. भ. प. प्रकाश म्हात्रे
उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालत नाही पण नामकरणात या ठाकरे सरकारने तसेच केले आहे. जनतेने तुम्हाला डोक्यावर बसवले तेच तुम्हाला पायदळी तुडवतील हे लक्षात घ्या तसे नको व्हायला तर विमानतळाला दिबांचे नाव द्या.

त्रिमूर्ती आणि लोकप्रतिनिधींची ताकद पाठीशी – जगदिश गायकवाड
लोकनेते रामशेठ ठाकूर, दशरथदादा पाटील, जगन्नाथदादा पाटील या त्रिमूर्तींची आणि आजी माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी, विविध पक्ष संस्था संघटनांची, तरुण, महिला, ज्येष्ठांची ताकद भूमिपुत्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपले तरुण अजून तापले नाहीत ते तापले तर राज्य सरकारला सलो का पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाहीत. भूमिपुत्रांनी घाबरण्याची गरज नाही. जिंकू किंवा मरू विमानतळाला दिबांचेच नाव देऊ. शिवसेनेला आगरी कोळी समाजाने मोठी केले आहे. दिबांचे नाव दिले नाही तर सोलल्याशिवाय राहणार नाही. मधल्या हरामखोरांनो भूमिपुत्र पेटून उठले आहेत हे याद राखा.


हडलप्पी करत पित्याच्या नावासाठी महाराष्ट्राची परंपरा संस्कृती मोडीत काढली- जगन्नाथ पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन बैठक झाल्या. २० जूनच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे वागणे अत्यंत चुकीचे होते. बालहट्टाप्रमाणे वागले, बैठकीतून उठून गेले. आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी वेदनादायी घटना घडली नसेल पण उद्धव ठाकरे यांनी ती केली. हडलप्पी करत पित्याच्यानावासाठी महाराष्ट्राची परंपरा संस्कृती मोडीत काढली. महाराष्ट्राची परंपरा आईबापाचे नाव देण्याची नाही हे लक्षात घ्या आणि लक्षावधी भूमिपुत्र जागा जागरूक झाला आहे हे ध्यानात ठेवा.

मुख्यमंत्री पक्षाचा नसतो जनतेचा असतो- आमदार रमेश पाटील
दिबांनी भूमिपुत्रांसाठी त्याग केला आहे. दिबांच्या कार्याची उंची मोजण्याचे प्रयत्न करू नका. मुख्यमंत्री पक्षाचा नसतो जनतेचा असतो. त्यामुळे भूमिपुत्रांवर अन्याय करू नका. दिबांच्या नंतर भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर करीत आहेत. वेळ पडल्यास यापेक्षा दहा पटीने आंदोलनकर्ते पुढच्यावेळी दिसतील.

दिबांच्या नावासाठी समाज काहीही करेल – आमदार राजू पाटील
आंदोलनाची परिस्थिती आणून विखुरलेला आमचा समाज एकत्र करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नामदार एकनाथ शिंदे यांनी केला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. पण विमानतळाला दिबांचेच नाव लागले पाहिजे आणि त्यासाठी समाज काहीही करेल आणि ते तुम्हाला दिसेलच.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.