दि बां च्या नावाला विरोध करणारे महाआघाडीचे नेते “समाजद्रोही”
विमानतळाच्या कामाचा एक दगड सुद्धा टाकून देणार नाही
राजकीय पुढाऱ्यांनी दबाव आणल्यास त्यांच्या तोंडावर राजीनामे फेकून मारू
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित १८ गाव समितीची खणखणीत भूमिका
सिटी बेल | पनवेल |
नवी मुंबईमध्ये उभारणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाला नाव कोणाचे द्यावे याचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. सोमवार दिनांक 7 जून रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित अठरा गाव समितीने पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबई विमानतळाला नाव दि बा पाटील यांचेच दिले पाहिजे अशी भूमिका मांडली.
आदल्या दिवशी म्हणजे रविवारी महा विकास आघाडीतील घटक पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव योग्य असल्याची भूमिका मांडल्यानंतर प्रकल्पग्रस्त बांधवांनी आक्रमक होत विमानतळाला नाव दि बा पाटील यांचेच देण्यासाठी चंग बांधला आहे.
नवी मुंबई चे विमानतळ पनवेल तालुक्यातील वडघर, करंजाडे, पारगाव,दापोली, ओवळे, कुंडेवहाळ, नानोशी, वाघिवली, उलवे, तरघर आदी ग्रामपंचायती मधल्या गावांवर वसवला जात आहे. या ग्रामपंचायतींमधील सरपंच उपसरपंच सदस्य हे एकवटले असून नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची त्यांनी तयारी दाखविली आहे.
यामध्ये महा विकास आघाडी मध्ये समाविष्ट राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असले तरीसुद्धा माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी एकत्र येताना ते आपापल्या राजकीय चपला काढून आले आहेत. त्यामुळे जर राजकीय पुढाऱ्यांनी आमच्यावर दबाव आणला तर आम्ही राजीनामे देऊ अशी खणखणीत भूमिका यावेळी प्रकल्पग्रस्त बांधवांनी मांडली.
महेंद्र पाटील,ऍड प्रशांत भोईर
नंदराज मुंगाजी,जयवंत परदेशी, सुनील म्हात्रे, सुनील परदेशी,गजानन पाटील,गोवर्धन डाउर,ऍड रेश्मा मूंगाजी,वनिता पाटील,किरण केनी,मच्छिंद्र नाथ धुमाळ आदी मान्यवरांनी पत्रकारांच्या समोर त्यांच्या भूमिका मांडल्या.








Be First to Comment