Press "Enter" to skip to content

विमानतळाला नाव कुणाचे ? बाळासाहेबांचे कि दि बां चे !

प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या हृदयात ज्यांचे नाव कोरले गेले आहे अशा दी बा पाटील साहेबांचे नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे : विजय शिरढोणकर यांची प्रांजळ भूमिका

सिडकोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे या स्वरूपाचा ठराव पारीत करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.हे जगजाहीर झाल्यावर भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधवांच्या मध्ये रोष उमटत आहे.लोकनेते माजी खासदार स्वर्गीय दिनकर बाळू पाटील यांच्या नावाला समस्त प्रकल्पग्रस्त बांधव एक दिलाने दुजोरा देत आहेत.प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या हृदयात ज्यांचे नाव कोरले गेले आहे अशा दी बा पाटील साहेबांचे नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे अशी प्रांजळ भूमिका सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच विजय शिरढोणकर यांनी मांडली आहे.

आमच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना ते म्हणाले की विमानतळ उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून गाव पातळी च्या बैठकांना मी उपस्थित रहात असे.2008 सालापासून प्रत्येक सभेत,चर्चेत आणि बैठकांचे मध्ये मी हीच भूमिका मांडत आलोय कि होणाऱ्या विमानतळाला माजी खासदार लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे. आज येथील स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधव जर खऱ्या अर्थाने श्रीमंतीचे सुखाचे समाधानाचे आयुष्य जगत असतील तर ते दि बा पाटील साहेब यांच्या धोरणी नेतृत्वामुळेच. त्यांच्या अभ्यासू लढ्यामुळे साडेबारा टक्के विकसित भूखंड परतावा योजना मंजूर झाली.

राज्याला तसा कायदा करण्यास त्यांनी भाग पाडले.आमची मुले शिक्षण घेऊन समर्थ झाली आहेत,प्रगतिशील झाली आहेत ते देखील त्यांच्या मुळेच.
विजय शिरढोणकर पुढे म्हणाले की, मी स्वतःला भाग्यवान समजतो की जवळपास 18 वर्षे लोकनेते दि बा पाटील यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलनांच्यात सहभागी होताना मी त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत जवळून पाहिले आहे.

एखादे काम हाती घेतले तर ते तडीस जात नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करत राहणे हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. एखादी समस्या यांच्याकडे घेऊन गेले असता ते तातडीने,” चला माझ्या सोबत” असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याच्या समोर जाऊन उभे ठाकायचे. मला आठवते की एकदा आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत बैठक घेत होतो. तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी आता लंच ची वेळ झाली आहे तर आपण जेवण करून घेऊ असे म्हटले. त्यावर उफाळून उठत पाटील साहेब म्हणाले की हक्काच्या जमिनी तुमच्या आस्थापनाला दिल्यानंतर इथला प्रकल्पग्रस्त उपाशी आहे, भविष्यात त्याच्या उदरनिर्वाहाचं कुठलेही साधन त्याला दिसत नाहीये आणि अशा वेळेला आपण जेवण करत बसणे माझ्या तत्वात बसत नाही. आधी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवरची बैठक पूर्ण करून,त्यावर उपाय शोधू,जेवण त्यानंतर करू.

केवळ जनहितासाठी संघर्षाचा वणवा पेटविणारे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले गेलेच पाहिजे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.