कर्जत तालुक्यातील तरुणाचा अमेरिकेत अनोख्या पद्धतीने विवाह संपन्न : दोघांच्या कुटुंबाची ऑनलाईन उपस्थिती
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील रहिवाशी व मुंबई येथे पोलिस निरीक्षक पदावर रुजु असलेले अनिल शंकर थोरवे ह्यांचा मुलगा अजय अनिल थोरवे आणि त्याची भारतातील केरळ येथील ब्राम्हण कुटुंबातील वर्ग मैत्रीण श्रीनिधी श्रीनिवास राघवन यांचे भारतीय वेळेनुसार दिनांक 17 मे 2021 रोजी सकाळी सहा वाजुन पंधरा मिनिटांनी सिॲटल अमेरिका येथे विवाह सोहळा पार पडला. सदर लग्नामध्ये दोघांचे सुमारे वीस मित्र-मैत्रिणी हजर होत्या.
कोरोना महामारीमुळे व विमान सेवा बंद असल्यामुळे दोघांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य लग्नाला हजर राहू शकले नाही. अजय आणि श्रीनिधी यांचं लग्न सुमारे दीड वर्षांपासून प्रलंबित होतं. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर 2 एप्रिल 2021 रोजी मुंबईमध्ये लग्न करण्याचे ठरले होते. त्यासाठी हॉटेल देखील बुक केले होते. सदर वेळी कोरोनामुळे अमेरिकेहून विमानांची वाहतूक बंद झाल्याने त्यांचे लग्न 17 मे रोजी मुंबईत करण्याचे ठरले होते. परंतु, ह्या ही वेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विवाह सोहळ्याच्या दुस-या नियोजनावर देखील पाणी फिरले आणि दोघांना भारतात यायला जमले नाही. म्हणुन दोघांच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न अमेरिकेत करण्याचा निर्णय घेतला व भारतातून ऑनलाइन हजेरी लावण्याचे निश्चित केले.

त्यानुसार सिॲटल अमेरिका येथे अमेरिकेतील तारखेनुसार दिनांक 16 मे 2021रोजी सायंकाळी सहा वाजता दोघांच्या सुमारे वीस मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये कोर्ट मॅरेज विवाह सोहळा पार पडला. दोघांच्याही कुटुंबियांना आनंद झाला असला तरीही त्यांच्या लग्नात उपस्थित राहू न शकल्याची खंत दोघांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.
अशाप्रकारे कोरोनाने भारतीय जोडीचे एक लग्न अमेरिकेत करण्यास भाग पाडले. अजय व श्रीनिधी या दोघांनी मुंबई युनिव्हर्सिटी मधून कम्प्युटर इंजिनीअरिंग केलेले असून अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. अजय एनव्हिडिया व श्रीनिधी मायक्रोसॉफ्ट या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत व सध्या दोघेही सिॲटल अमेरीका येथे राहत आहेत. आशा आहे की कोरोना लवकरात लवकर आपला गाशा गुंडाळेल व नवविवाहीत जोडपे भारतात येईल.








Be First to Comment