घेतल्याने सुरक्षित होती रे,आधी घेतलेची पाहिजे…!
अर्थातच कोरोना प्रतिबंधक लस.
पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 60 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक यांना लस देण्यात आली.त्यानंतर 45 वर्षे वयाहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात आली आणि आता तर 18 ते 45 वर्षे वय असणाऱ्यांना लसीकरण सुरू आहे.तूर्तास लसीकरणाच्या गतीला वेग येत नाही. नोंदणी करता सॉफ्टवेअरमध्ये लवकर नंबर लागत नाही, अपॉइंटमेंट करता वाट पाहावी लागते आहे. पण इतके सगळे असले तरी सुद्धा कोरोनाविषाणू वर मात करण्यासाठी लसीकरण हाच अंतिम पर्याय आहे हे सुद्धा ध्यानात ठेवले पाहिजे.
लोकांच्या मनात या लशीविषयी काही शंकाही आहेत. कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज पसरले आहेत.उदाहरणार्थ, कोरोना लस घेतल्यामुळे स्त्री किंवा पुरुषाला नपुंसकत्व येतं किंवा चेहरा अर्धांग वायूने लुळा पडतो, असी कितीतरी …. काहींना वाटते आजपर्यंत काही झाले नाही मग कशाला उगाच लस घ्या,कित्येकांना वाटते लस घेऊन भलते सलते साईड इफेक्ट झाले तर??? पण अशा सगळ्या शंकाकुशंका ना फाट्यावर मारून प्रत्येकाने लस घेतलीच पाहिजे हे मात्र त्रिकालबाधित सत्य नाकारता येणार नाही.
लस घेण्यापूर्वी किमान तीन तास आधी काही खाऊन जावे. उपाशी पोटी कोणतीही वेदना सहन करण्याची शक्ती कमी असते. लसीचं इंजेक्शन घेताना कमी दुखत असलं, तरी रिकाम्यापोटी लस घेऊ नये.लस घ्यायला जाताना बीपी, मधुमेह किंवा अन्य कोणत्याही आजाराच्या गोळ्या आपल्या नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे घ्याव्यातच.मधुमेह हा ‘कोमॉर्बिड’ म्हणजे दीर्घकालीन आजारात गणला जातो. अशांना करोनाची लागण लवकर होते आणि झाल्यावर रुग्णाची तब्येत गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी करोना प्रतिबंधक लस घेतलीच पाहिजे.हृदयविकार असणे हेही कोमॉर्बिड म्हणजे दीर्घकालीन आजारामध्ये मोडतं. सबब लसीकरण नक्कीच करून घ्यावं.पॅरालिसिस म्हणजेच लकवा किंवा अर्धांगवायू. या आजाराचा समावेशही ‘कोमॉर्बिड’ आजारात होतो. त्यामुळेच त्यांनीही लसीकरण करून घ्यावं.
आपल्या देशात करोनाच्या ज्या लशी दिल्या जात आहेत, त्यानं कोणतेही गंभीर साइड इफेक्ट्स होत नाहीत. लस घेताना किंचितसं दुखणं, दुसऱ्या दिवशी इंजेक्शनच्याजागी दंडावर सूज येते. ती दोन-तीन दिवसानंतर आपोआप कमी होते. काही व्यक्तींना दोन दिवस ताप येतो, अंग-हातपाय दुखतात, खूप गळून गेल्यासारखं वाटतं. मात्र, ही लक्षणेही दोन-तीन दिवसात त्वरित कमी होतात. क्वचित प्रसंगी काहींना लस घेतल्यानंतर गरगरतं; पण त्यासाठी आपल्याला अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबवलं जातं. काही इतर त्रास झाल्यास डॉक्टर्स आणि उपचाराची सोय असते. करोनाची लस घेतल्यावर भारतात आजपर्यंत एकही गंभीर घटना घडलेली नाही. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे.
कोव्हॅक्सीन’मध्ये पूर्ण मृत अवस्थेतील करोना विषाणू वापरलेले असतात, तर ‘कोव्हिशिल्ड’ ही अॅडीनोव्हायरस वापरून केलेली असते. साहजिकच या लशी घेतल्यामुळे करोना होत नाही. मात्र, पहिला डोस घेतल्यावर १५ दिवसांनी त्या व्यक्तीमध्ये प्रतिपिंडे तयार होऊ लागतात. त्यानंतर शरीरात ५० टक्के प्रतिकारशक्ती येते. पहिल्या डोसनंतर २८-४२ दिवसांनी ‘कोव्हक्सीन’चा, तर ४२ ते ५६ दिवसांनी ‘कोव्हिशिल्ड’चा दुसरा डोस दिला जातो. हे दुसरे डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी शरीरात एकूण ९५ टक्के प्रतिपिंडे तयार होतात. याचाच अर्थ लस घेतली, तरी आपण करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो, तर पहिल्या १५ दिवसांत बाधा होण्याची शक्यता १०० टक्के असते, १५ दिवस ते ४२ दिवस या काळात ही शक्यता ५० टक्के असते. त्यानंतरही पुढं बाह्यसंसर्गामुळे करोना होण्याची शक्यता टक्के १० ते २० टक्के राहते. करोनाच्या सध्याच्या लशीचा परिणाम एक वर्ष टिकतो, असं सध्या सांगितलं जात आहे.त्यामुळे कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, आणि सातत्याने हात धूत राहणे हे निर्बंध लसीकरणानंतर देखील पाळावेच लागतील.
आजमितीला भारतात आणि जगभरात ज्या लशी उपलब्ध झाल्या आहेत, त्यात १८ वर्षाखालील मुलं आणि गरोदर स्त्रियांनी घेऊ नयेत असं सांगितलं गेलं आहे; याचं कारण या लशींच्या चाचण्या १८ वर्षांवरील व्यक्तींच्या आणि गरोदर नसलेल्या स्त्रियांच्याच घेतल्या गेल्या आहेत.
ज्या स्त्रियांना एक वर्षाचं बाळ आहे आणि ज्या त्यांना स्तनपान करतात, अशा मातांनी लस घेऊ नये. या बाबतच्या मार्गदर्शक सूचना फारशा स्पष्ट नाहीत.
कोव्हिड 19च्या लशीमुळे स्त्री किंवा पुरुषांमध्ये नपुंसकत्व येतं अशा प्रकारचा कुठलाही शास्त्रीय पुरावा समोर आलेला नाही. कोव्हिड 19 रोगामुळेही नपुंसकत्व किंवा वंध्यत्व येत नाही.’
भारतीय नागरिकांच्या मानसिकतेचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांचा वाईट आणि तद्दन खोट्या गोष्टींवर चटकन विश्वास बसतो परंतु सत्य मात्र त्यांच्या गळी उतरवाव लागते. म्हणजे हेच बघा ना, गणपती दूध पितो याचे कुठेही अधिकृतरीत्या प्रकाशन झाले नाही तरीसुद्धा अवघ्या तासाभरात देशभरातील लोकांनी गणपतीसमोर दुधाचे चमचे धरले, हजारो लिटर दूध फुकट घालवले, पण याच लोकांना रक्तदान करा ! हे कानीकपाळी ओरडून सांगावे लागते. लसीकरणाचे देखील तसेच काहीसे आहे. स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे नागरिक सुद्धा आज लसीकरणाचे बाबत भयगंड बाळगून आहेत. संपूर्ण जगामध्ये अभिमानाने भारतीयांची मान उंचावणारे हे लसीकरण आपल्यासाठी खचितच अभिमानाची बाब आहे. कोरोनाविषाणू च्या पहिल्या लाटेत आपल्या देशाने जगाला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन सारखी औषधे पुरविली. आणि दुसऱ्या लाटेच्या पूर्वी आपल्या देशातील दोन कंपन्यांनी लस बनवून जगाला कोरोना मुक्ती चे स्वप्न दाखवले. कोरोनाविषाणू ला प्रतिबंध करणाऱ्या लसीबाबत असलेले सगळे गैरसमज बासनात गुंडाळून प्रत्येकाने ही लस घेतलीच पाहिजे. म्हणून आवर्जून सगळ्यांना सांगतो की घेतल्याने सुरक्षित होती रे,आधी घेतलेची पाहिजे…!
Be First to Comment