स्थानिक राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।
भाजपचे नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांची जीवनाबरोबरची लढाई अखेर संपली. भोपी गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. शेवटी बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी प्रेमा भोपी आणि मुलगा अभिषेक त्याच बरोबर इतर कुटुंबीय आहेत. त्यांच्या निधनाने खांदा वसाहतीवर शोककळा पसरली. त्याचबरोबर भाजपमध्ये आणि स्थानिक पातळीवरील राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या संजय भोपी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात संघर्ष केला. रियल इस्टेटमध्ये त्यांनी जम बसवला. युवा उद्योजक म्हणून ते पुढे आले. पनवेल नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी पदार्पण केले पण त्यांना अपयश आले त्यानंतर संजय भोपी यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांना प्रभाग १५ मध्ये पक्षाने उमेदवारी सुद्धा दिली. आणि ते निवडून सुद्धा आले. अत्यंत कमी कालावधी मध्येच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या गुड बुकात भोपी यांनी जागा मिळवली होती. लागलीच त्यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर प्रभाग समिती ब चे सभापतिपद सुद्धा त्यांना देण्यात आले.
एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रभाग समिती सभापती असा त्यांचा प्रवास राहिला. संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सिटीझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुप या संस्थांमध्ये ते सक्रिय होते. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ते कायम धावून जात असत. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत तत्पर असलेले कार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. खांदा वसाहतीतील प्रश्न आणि समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ते कायम पाठपुरावा करत असत. मितभाषीक, संवेदनशील, प्रेमळ आणि मनमिळावू असे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. दांडगा जनसंपर्क, मोठा मित्रपरिवार त्यांच्याकडे होता. अज्ञात शत्रू म्हणून त्यांची पनवेलच्या राजकारणामध्ये ओळख होती.
दरम्यान कोरोनाच्या काळात त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी मधून प्रभावी काम केले. गोरगरीब गरजूंना मदतीचा हात दिला. हे करत असताना त्यांना कोरोनाविषाणूचा संसर्ग झाला. संजय भोपी यांना उपचारासाठी अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्रकृती सुद्धा सुधारणा झाली. परंतु त्यानंतर पुन्हा प्रकृती खालावली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः लक्ष घालून त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आपल्या जीवनाबरोबर लढाई सुरु होती. अखेर बुधवारी या लढवय्या लोकप्रतिनिधी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.








Be First to Comment