आजिया अमुचा दिनू म्हणोनी सुखावलो
मांदियाळीत “पीत” पाहून खिन्न जाहलो
लेखणी आताशा म्यान झाली
Ctrl c अन् ctrl v आयुधे झाली
पेड पी सी ची आस लागली
आमंत्रणावर नजर खिळली
आजिया अमुचा दिनू म्हणोनी सुखावलो
मांदियाळीत पीत पाहून खिन्न जाहलो
पाकिटांचा खेळ सारा
टाळती वंचितांच्या नजरा
सुंघता अपहार, टक्क्यासी तत्पर
पार्टी झोडण्या पोहोचतात सत्वर
आजिया अमुचा दिनू म्हणोनी सुखावलो
मांदियाळीत पीत पाहून खिन्न जाहलो
नाक दाबून तोंड उघडावे
बिना otp ने ई वॉलेट खोलावे
संस्था संघटन चाले यथा शक्तीने
पाहतो आम्ही सारे मुक संमतीने
आजिया अमुचा दिनू म्हणोनी सुखावलो
मांदियाळीत पीत पाहून खिन्न जाहलो
गुटखा गांजा हुक्का अन जुगार
बनली उदरनिर्वाहाची साधने
उदंड जाहला गुन्हेगारी व्यापार
यज्ञ चालविला अवधाने
आजिया अमुचा दिनू म्हणोनी सुखावलो
मांदियाळीत पीत पाहून खिन्न जाहलो
अधिकारी राजकारण्यांच्या द्वारी
“खास” होण्याची स्पर्धा न्यारी
जाहिरातीच्या मलई साठी
विशेषांकाचे गठ्ठे भारी
आजिया अमुचा दिनू म्हणोनी सुखावलो
मांदियाळीत पीत पाहून खिन्न जाहलो.
निवडणुका म्हणजे पर्वणी
पॅकेज साठी जत्रा लागे अंगणी
गुलाल कोणाचाही उडो
आम्हास प्यारि खंडणी
आजिया अमुचा दिनू म्हणोनी सुखावलो
मांदियाळीत पीत पाहून खिन्न जाहलो.
वृत्तपत्रांचे उंबरठे बदलले कपड्यासारखे
उडती इकडे तिकडे पाचोळ्यासारखे
या साऱ्यात गाभा लिहिलाच नाही
लेखणीचे मोल यांसी कळलेच नाही
आजिया अमुचा दिनू म्हणोनी सुखावलो
मांदियाळीत पीत पाहून खिन्न जाहलो..
मंदार मधुकर दोंदे.







Be First to Comment