Press "Enter" to skip to content

रसायनी पोलीस ठाण्याचा ध्वजारोहण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या हस्ते मुसळधार पावसातही राष्ट्रप्रेमाचा उत्स्फूर्त जागर; पो.नि.भुजबळ व सहाय्यक फौजदार कोळेकर यांच्या कृतीतून देशभक्तीचा अनोखा संदेश

रसायनी(आनंद पवार)भारतीय स्वातंत्र्याचा ८०वा वर्धापन दिन रसायनी परिसरात देशभक्ती, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. रसायनी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी,कर्मचारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी, पोलीस पाटील तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच रसायनी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र,पावसाची कोणतीही तमा न बाळगता शालेय विद्यार्थी,पोलीस अधिकारी-कर्मचारी, पोलीस पाटील आणि नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह कायम ठेवला. रसायनी पोलीस ठाण्याच्या ध्वजारोहणाच्या काही वेळ आधीच पावसाने दमदार हजेरी लावली होती.तरीही राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थितांनी कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला. विशेष म्हणजे, कार्यक्रम सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत पावसाची सर सुरू असतानाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ आणि सहाय्यक फौजदार लालासाहेब कोळेकर हे राष्ट्रध्वजासमोर ठामपणे उभे राहिले. मुसळधार पावसामुळे दोघेही पूर्णपणे भिजले,मात्र कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत त्यांनी आपल्या जागेवरून न हलता राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि वंदे मातरम्‌ला सन्मानपूर्वक मानवंदना दिली.

त्यांच्या या कृतीतून ‘देश प्रथम’ या भावनेचा प्रत्यय उपस्थितांना आला. गणवेशातील कर्तव्य बजावताना राष्ट्रध्वजाप्रती असलेला आदर, देशाबद्दलची अस्मिता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना त्यांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केली.पावसाच्या सरी अंगावर झेलत राष्ट्रध्वजासमोर ताठ उभे राहिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे हे दृश्य उपस्थितांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरले.
राष्ट्रध्वजाला सलामी देताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर देशभक्तीचा अभिमान दिसून येत होता.भारत माता की जय,वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सव नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्याचा आणि राष्ट्राच्या अखंडतेसाठी आपली जबाबदारी ओळखण्याचा दिवस असल्याची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली.

रसायनी पोलीस ठाण्यातील या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात पावसाने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी राष्ट्रप्रेमाच्या उत्साहापुढे पावसाची सरही फिकी पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ आणि सहाय्यक फौजदार लालासाहेब कोळेकर यांच्या राष्ट्रध्वजाप्रती असलेल्या निष्ठेचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.त्यांच्या या कृतीने स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला केवळ औपचारिकतेपलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमाचा जिवंत संदेश मिळाला.रसायनी परिसरात विविध शाळा,शासकीय कार्यालये,सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.सर्वत्र तिरंगा फडकत असताना देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.पावसाच्या सरी आणि तिरंग्याची शान यांचा सुंदर संगम घडवत रसायनी पोलीस ठाण्यातील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला.राष्ट्रध्वजासमोर पावसातही ताठ उभे राहिलेले पोलीस अधिकारी-कर्मचारी म्हणजे कर्तव्य, राष्ट्रनिष्ठा आणि देशभक्तीचा प्रेरणादायी संगमच म्हणावा लागेल.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.