Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्य दिनानिमित्त करंजाडे येथील आदिवासी वाड्यांमध्ये विशेष जात प्रमाणपत्र वितरण शिबिर

करंजाडे, दि. १५ ऑगस्ट २०२६ : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय, पनवेल तसेच तहसीलदार कार्यालय, पनवेल यांच्या वतीने करंजाडे परिसरातील आदिवासी वाडी, गायकर वाडी, लालवाडी व वरची वाडी येथील आदिवासी बांधव तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष जात प्रमाणपत्र वितरण शिबिर आयोजित करण्यात आले. शासनाच्या “शासन आपल्या दारी” या संकल्पनेच्या माध्यमातून महसूल प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या वाड्यांपर्यंत पोहोचून आवश्यक महसुली सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम यावेळी राबविण्यात आला.

या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली आणि अवघ्या चार दिवसांत प्रमाणपत्रांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संबंधित लाभार्थ्यांना प्रत्यक्ष प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामुळे वाडीतील नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता भासली नाही.

या उपक्रमांतर्गत पाच वर्षांच्या बालकांपासून ते ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, शासकीय योजना व विविध आरक्षणाच्या लाभांसाठी जात प्रमाणपत्राचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

उपविभागीय अधिकारी, पनवेल श्री. पवन चांडक यांनी स्वतः आदिवासी वाडीमध्ये उपस्थित राहून लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वितरण केले. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी, महसुली प्रश्न आणि शासकीय योजनांबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी श्री. पवन चांडक यांनी जात प्रमाणपत्र हे पुढील पिढ्यांसाठी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व शासकीय हक्कांशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज आहे, त्यामुळे त्याचे योग्य प्रकारे जतन करावे, असे आवाहन केले. तसेच आदिवासी समाजाच्या परंपरागत वस्ती, सांस्कृतिक वारसा, पारंपरिक हक्क आणि जमिनींचे संरक्षण व संवर्धन करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

आदिवासी बांधवांनी आपल्या जमिनींचे संरक्षण करून जमीन विक्री टाळावी व उपलब्ध जमिनीवरच शाश्वत विकास, उपजीविका आणि पारंपरिक जीवनपद्धती यांचा समतोल साधावा, याबाबतही त्यांनी सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शन केले. पारंपरिक वस्ती आणि हक्कांचे जतन करताना शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ घेऊन आर्थिक व सामाजिक प्रगती साधता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

तसेच महसूल विभाग व महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित आदिवासी बांधवांना देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या उपलब्ध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

ज्या दळीधारकांना अद्याप सनद प्राप्त झालेली नाही, अशा लाभार्थ्यांच्या प्रकरणांचे प्रस्ताव आवश्यक कार्यवाहीसाठी पुढे पाठवून त्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. दळी जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये उपलब्ध अभिलेख, पात्रता व शासनाच्या प्रचलित नियमांनुसार कार्यवाही करण्यासाठी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिबिरादरम्यान वैयक्तिक स्वच्छता व मासिक पाळीच्या काळातील आरोग्यविषयक काळजीबाबत मार्गदर्शन करून सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले. महिलांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे व आरोग्याशी संबंधित आवश्यक बाबींमध्ये उपलब्ध शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमातून महसूल प्रशासनाने केवळ जात प्रमाणपत्रांचे वितरण न करता आदिवासी बांधवांपर्यंत महसुली सेवा, शासकीय योजनांची माहिती आणि हक्कांबाबत जनजागृती पोहोचविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना त्यांच्या दारात आवश्यक प्रशासकीय सेवा उपलब्ध करून देणे, कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करणे आणि वंचित घटकांना शासनाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या उपक्रमाचे आयोजन उपविभागीय अधिकारी, पनवेल श्री. पवन चांडक तसेच तहसीलदार, पनवेल श्रीमती मीनल भोसले भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच नायब तहसीलदार श्रीमती राजश्री जोगी यांचेही या उपक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

यावेळी मंडळ अधिकारी ओवळे श्री. सचिन गणपत सांबरी, मंडळ अधिकारी पळस्पे श्री. शशिकांत भाऊसाहेब सानप, ग्राम महसूल अधिकारी, करंजाडे श्री. आकाश तानाजी मदने, तसेच तहसीलदार कार्यालय, पनवेल येथील महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी करंजाडे ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती मनीषा जायभाये यांचे सहकार्य लाभले. तसेच करंजाडे ग्रामपंचायत सरपंच श्री. मंगेश शेलार यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले. पोलीस पाटील श्री. कुणाल लोंढे यांनी आदिवासी वाडीतील नागरिकांना जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेसाठी आवश्यक सहकार्य केले. तसेच आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती हेमा पवार यांनीही नागरिकांशी समन्वय साधत या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे करंजाडे परिसरातील आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्कांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे वेळेत उपलब्ध झाली असून, महसूल प्रशासन आणि आदिवासी समाज यांच्यातील थेट संवाद, समन्वय आणि विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.