मुक्ताईनगर मधील मानेगाव या मूळ गावचे लक्ष्मणराव वामनराव चौधरी यांनी २७ ऑगस्ट रोजी अंधेरी येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी त्यांचे वय ८९ वर्षे होते.आय ए एस पदावर सेवानिवृत्त झालेल्या लक्ष्मणराव चौधरी यांची प्रशासकीय सेवेतील कारकीर्द अत्यंत दैदिप्यमान अशी राहिलेली आहे.
कै. लक्ष्मणराव वामनराव चौधरी यांचा जन्म एका कोरडवाहू शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आई-वडिलांच्या दूरदृष्टी व भक्कम पाठिंब्यामुळे अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी मानेगाव, थोरगव्हाण, जळगाव आणि पुणे येथून शिक्षण पूर्ण केले. वयाच्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नांत लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवत १९५७ सालात तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यात मामलतदार या पदावर ते सेवेत रुजू झाले.पुढे १९६१ सालात महाराष्ट्र राज्यात बढती मिळवून उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व आय ए एस मध्ये नामनिर्देशित करण्यात आले. त्यांच्या ४० वर्षांच्या सेवा काळात त्यांनी नाशिक चिटणीस,ठाणे तालुक्याच्या ग्रामीण भागात तलासरी, डहाणू येथे एस डी ओ, कोकणभवन, खादी ग्रामोद्योग मंडळ, CIDCO, सह संचालक म्हणून आदिवासी विकास महामंडळ,व मुख्यमंत्री कार्यालय अशा विविध ठिकाणी उल्लेखनीय काम केले. बोईसर औद्योगिक वसाहत, तारापूर अणू ऊर्जा प्रकल्प, ट्वीन सिटी नवी मुंबई भू संपादन, दापचेरी डेअरी प्रकल्प ही त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची काही प्रातिनिधिक उदाहरणे. मुख्यमंत्री कार्यालय येथे OSD म्हणून जमीन सुधारणा, आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
१९९७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावरही २०१० पर्यन्त CMO आणि अंधेरी औद्योगिक वसाहत येथे ते सल्लागार या पदी कार्यरत होते. विशेष उल्लेखनीय म्हणजे महसूल अधिकाऱ्यांची संघटना बांधणी मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. उपजिल्हाधिकारी पदावरून आय ए एस पदांवर जाण्यापूर्वी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागत असते. त्यामुळे महसूल अधिकारी यांच्या मध्ये नैराश्य निर्माण होत असे. या करिता अपर जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.सेवानिवृत्त सहसचिव वसंत वामन चौधरी आणि माजी राज्य माहिती आयुक्त पंढरीनाथ वामन पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.
त्यांच्या पश्चात २ विवाहित मुले आणि १ विवाहिल मुलगी,सुना,जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.




Be First to Comment