
गाव विकासाचे ‘शेलघर’ मॉडेल महाराष्ट्राला आदर्शवत : महेंद्रशेठ घरत
उलवे, ता. ३० : राजकीय इच्छाशक्ती असेल तर गावाचा विकास शहरांपेक्षा सुंदर होऊ शकतो. ‘एकविसाव्या शतकातील सुनियोजित शहर’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या सिडकोच्या विकसित, विकसनशील नोडची अवस्था आजघडीला ‘नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा’ याप्रमाणे झाली आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, रस्त्यांची दुरावस्था, उघडी गटारे, बेकायदा आठवडा बाजारातील दुर्गंधी, अशा अवस्थेत असणारे उलवे नोडच्या कुशीत ‘शेलघर एक टुमदार गाव’ आहे. त्याचा विकास गेल्या १५ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर सुंदर आणि विकसित शेलघर गाव असा प्रवास कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी करून सर्वपक्षीय खासदार, आमदार, राजकारण्यांच्या डोळ्यांत शेलघर विकासाचे मॉडेल उभे करून झणझणीत अंजन घातलेले आहे. शुक्रवारी (ता.२९) शेलघरमधील ४००० स्के. फुटांच्या वातानुकूलित मोफत व्यायामशाळेच्या सातव्या वर्धापनदिन झाला.
यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी सुंदर, टुमदार बंगल्यांचे गाव अशी त्याची नवी ओळख आहे त्या शेलघर गावाच्या विकासाचे रहस्य उलगडले. गावातील युवक-युवतींसाठी मोफत व्यायामशाळा, गावातील लग्न कार्य, डोहाळे जेवण, वाढदिवस साजरे करण्यासाठी आलिशान अशा ‘जोमा नारायण घरत’ वातानुकूलित समाज मंदिराची उभारणी, युवकांसाठी सुसज्ज खेळाचे मैदान, जलकुंभ, अंतर्गत गटारे, सीसीटीव्ही, हायमास्ट, स्ट्रीट लाईट, भव्यदिव्य साई मंदिराची उभारणी अंतिम टप्प्यात अशाप्रकारे रचनात्मक विकासाचे मॉडेल ‘माझं गाव आणि मी गावासाठी’ केले आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यपातळीवर काम करीत असताना ‘घार हिंडे आकाशी, मात्र तिची नजर आपल्या पिल्लांपाशी’, तसेच ‘महेंद्रशेठ फिरतो जगभर, मात्र लक्ष आपल्या गावावर’ अशा आत्मियतेने शेलघर विकासाचे मॉडेल उभे करून आज अभिमानास्पद कामगिरी केली आहे.




Be First to Comment