
पनवेल दि. २९ ( वार्ताहर ) : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), ठाणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांनी संजय गोविलकर यांच्याकडून या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. संजय गोविलकर यांच्या कार्यकाळातही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिशय धाडसी कारवाया केल्या.
यापूर्वी श्री.सोनवणे हे महाराष्ट्र पोलीस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. त्यांच्याकडे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांचा तपास करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उप अधीक्षक पदावर धडाडीने काम केले आहे, ज्यामुळे त्यांना भ्रष्टाचारविरोधी मोहिमांची सखोल माहिती आहे. तसेच सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, नागपूर शहर, मुंबई शहर, नाशिक शहर तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही उत्कृष्ट सेवा बजावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून श्री.सोनवणे यांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येईल आणि लाचखोरीला रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमांना बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




Be First to Comment