


पनवेल(प्रतिनिधी) एकाहून एक सरस शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणाने पनवेलची सांस्कृतिक भूमी भारतीय शास्त्रीय नृत्याच्या रंगांनी उजळून निघाली. समृद्ध नृत्य वारशाच्या जतन व प्रसारासाठी समर्पित असा “मयूखा महोत्सव” नृत्यार्पणा फाईन आर्ट्स सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. परंपरा आणि कलात्मकतेचा संगम असलेला हा महोत्सव नृत्याचा अद्वितीय सोहळा ठरला.
पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे झालेल्या या महोत्सवाला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व मयूखा महोत्सव प्रायोजक परेश ठाकूर, अर्चना ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माय भारत रायगड व रत्नागिरी विभागाचे उपसंचालक अमित पुंडे, भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, नॅशनल टेलिफोन अॅडव्हायजरी कमिटी सदस्य श्री. रमेश कळंबोली, माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, श्वेता शेट्टी, यमुना प्रकाशन विशेष पाहुणे म्हणून नालंदा नृत्यकला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उमा रेले, मोहिनीअट्टम नृत्यांगना व संस्थापिका निदेशिका डॉ. डिंपल नायर तर सेलिब्रिटी पाहुणे म्हणून मल्याळम अभिनेत्री व शास्त्रीय नृत्यांगना देवी चंदना, मराठी अभिनेत्री व शास्त्रीय नृत्यांगना तन्वी पळव यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक उपस्थित होते.
कलाकार, रसिक आणि सांस्कृतिक प्रेमींना एका व्यासपीठावर आणण्याच्या दृष्टिकोनातून पद्मभूषण डॉ. कनक रेले यांच्या शिष्या व नालंदा नृत्यकला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी नयना प्रकाश यांच्या संकल्पना व दिग्दर्शनाखाली हा उत्सव आयोजित आयोजित करण्यात आला होता. महोत्सवात नालंदा बानीतील मोहिनीआट्टमचे नयना प्रकाश यांचे जवळपास दिड तास मनमोहक सोलो सादरीकरण झाले. त्यांच्या सादरीकरणात लास्य आणि रौद्रम यांचा सुंदर समन्वय दिसून येत होता. त्यामुळे प्रत्येक नृत्यप्रयोग दृश्य व भावनिक दृष्ट्या अद्वितीय ठरला. या महोत्सवात नालंदा बानीतील मोहिनीयट्टम ख्यातनाम वादकांचा थेट वाद्यमेळ पनवेल व परिसरातील कला-रसिकांना एक सांस्कृतिक मेजवानी सुद्धा देऊन गेला. कलाश्री कलामंडलम सी. गोपाळकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यकलामंदिरम् सेंटर फॉर आर्ट्समार्फत त्याचे सादरीकरण झाले. त्यामुळे प्रेक्षकांना एक अद्वितीय असा सांस्कृतिक अनुभव अनुभवायला मिळाला. परंपरा आणि कलात्मकतेचा संगम असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी एक पर्वणी आहे.
पनवेल हे एक महानगरीय शहर बनत असताना, रस्ते आणि विमानतळांसारख्या भौतिक पायाभूत सुविधांवरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पण त्याच बरोबर आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा जपण्यावर देखील लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या गोष्टी खरोखरच आपल्याला परिभाषित करतात आणि आपल्याला एक महान राष्ट्र बनवतात. त्यामुळे आपल्या हा वारसा पुढच्या पिढीला देऊन त्यांना हा पुढे घेऊन चालवायचा आहे. – आमदार प्रशांत ठाकूर
आपला पनवेल म्हणजे आगरी, कोळी, कराडी, भंडारी, मराठा आणि विविध जातीच्या लोकांना सामावलेला परिसर आहे. जिथे नृत्य संगीत आणि त्याचबरोबर चांगले असे विचार घेऊन चालणारा समाजही या पनवेलची ओळख आहे. आता पनवेल परिसर हा कॉस्मोपॉलिटन असा समाज होत चालला आहे. पनवेलमध्ये हा मयूखा हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाल्याबद्दल सर्व आयोजकांचे अभिनंदन. या कार्यक्रमांमुळे पनवेलची संस्कृती आणखी वाढत जाईल. येणाऱ्या काळात देखील अश्या प्रकारचे कार्यक्रम व्हावेत यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी चे नेहमीच सहकार्य लाभेल. – परेश ठाकूर, माजी सभागृहनेते पनवेल महानगरपालिका
"मयूखा" हे असे व्यासपीठ आहे जे केवळ शास्त्रीय नृत्यप्रकारांची गहनता आणि सौंदर्य प्रदर्शित करत नाही तर पुढील पिढीतील कलाकारांना प्रोत्साहन देते. नृत्यार्पणा फाईन आर्ट्स सेंटर या उपक्रमाद्वारे तरुण नर्तकांना प्रेरणा देण्याचे आणि प्रेक्षकांना भारताच्या पारंपरिक कलांचा खरा आस्वाद आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न करते. त्यामुळे आता त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून "मयूखा" चे लॉन्चिंग करण्यात आले आहे.




Be First to Comment