
मुलांच्या वस्तीगृहासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून ५० लाखाची देणगी जाहीर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजसेवा आदर्श समाजातील सर्वांसाठी महत्त्वपूर्ण – रयत शिक्षण संस्था चेअरमन चंद्रकांत दळवी
पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजातील अत्युच्च आणि महान व्यक्तिमत्व असून त्यांनी केलेल्या समाजसेवा कार्याचा आदर्श समाजातील सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे, अशा गौरवोद्गारांतून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सातारा येथे सन्मान केला.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या देणगीतून सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे साकारण्यात आलेल्या ‘रामशेठ ठाकूर अभ्यासिका’ आणि सौ.मिनल व श्री अमोल उनउणे यांच्या देणगीतून साकार झालेल्या प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब ऊनउणे स्मृती दालन व मराठी भाषा प्रयोगशाळेचा लोकार्पण सोहळा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अँड.भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सन्माननीय सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विकास देशमुख, जे के बापू जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रि. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मुलांच्या वसतिगृहासाठी तब्बल ५० लाख रुपयांची देणगी जाहीर केली. विद्यार्थ्यांसाठी ही देणगी मोठा दिलासा ठरणार असून यामुळे उच्च दर्जाच्या राहण्याच्या सुविधा व समृद्ध शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य व सकारात्मक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे ग्रामीण व उपनगरातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लागणार आहे. समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या कार्यातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण प्रस्थापित झाले आहे.त्याप्रती कॉलेज प्रशासनाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या या उदार देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमात ऍड. भगीरथ शिंदे, डॉ. ज्ञानदेव मस्के प्रा. डी. ए. माने, मीनल उनउणे, यांनी मनोगते व्यक्त केले. छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा चे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. आबासाहेब उमाप यांनी आभार मानले डॉ. विद्या नावडकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक तसेच छत्रपती शिवाजी कॉलेजचे आजी- माजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




Be First to Comment