Press "Enter" to skip to content

जिल्हा पोलीस अधीक्षिका आंचल दलाल यांनी दाखवला हिरवा झेंडा

फिट इंडिया मोहिमेंतर्गत कर्जत खालापूर रस्त्यावर सायकलथॉनमध्ये शेकडो सायकलपटूंचा सहभाग

खालापूर : प्रतिनिधी

भारत सरकारच्या निर्देशानुसार व फिट इंडिया मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हा पोलीस आयोजित सायकलथॉन 2025 चे आयोजन खालापूर तालुका पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले. या अभूतपूर्व अशा सायकल स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका श्रीमती आंचलदलाल यांची विशेष उपस्थिती होती. पळस दरी ते हॉलिडे बँक्वेट हॉल अंजरूण या दरम्याच्या दहा किलोमीटर एवढ्या अंतराच्या स्पर्धेस त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.

सायकल इंडियाचे सायकल पटू, हौशी सायकल पटू, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यांचा शेकडोच्या सहभागातून सायकलथॉन स्पर्धेचा उत्साह ओसंडून वाहत होता.

खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या सायकलथॉन स्पर्धेत विश्वजीत पोळ यांनी 20.22 सेकंदात दहा किलोमीटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळवला तर अनुक्रमे आर्यन सणस आणि अविनाश पाटील यांनी काही सेकंदाच्या फरकाने दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले त्याच बरोबर वय वर्ष 6 ते 60 पेक्षा अधिक वयाच्या सायकलपटूंनी स्पर्धेत चुरस दाखविल्याबद्दल सर्वांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल मेहुल, कर्जत तालुक्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, निवासी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी नारनवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार – खालापूर, सचिन हिरे – खोपोली, संजय बांगर – रसायनी, संदीप भोसले – कर्जत, सरिता चव्हाण – अलिबाग हॉलिडे बँक्वेट हॉलचे मालक अब्दुल अजीज बारुदगर, अझीम कर्जीकर, यांनी सायकलथॉन स्पर्धेच्या आयोजनात विशेष भूमिका बजावली. हेल्प फाउंडेशन, सायकल इंडिया, यशवंती हायकर्स, खोपोली व्यापारी असोसिएशन, करियर कोचिंग क्लासेस इत्यादी संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

प्रसिद्ध अशा रायगड पोलिस दलाच्या बँड कलाकारांनी सादर केलेल्या संगीताच्या पार्श्वभूमीवर, जगदीश मरागजे यांच्या सूत्र संचलनाच्या साथीने हॉलिडे बँक्वेट हॉलमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला. सुसज्जय यंत्रणा, शिस्तबद्ध आयोजन आणि उस्फुर्त सहभागाने सायकलथॉन स्पर्धेस विशेष दर्जा प्राप्त झाल्याची भावना पोलीस अधीक्षिका आंचल दलाल यांनी व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.