
२३ ऑगस्ट हा दिवस रायगडभूषण पं. उमेश निवृत्तीबुवा चौधरी यांचा वाढदिवस. स्वरांप्रती अपार निष्ठा, संगीतसेवा आणि समाजकारणाशी जोडलेली त्यांची कलावंताची वाटचाल यामुळे आज ते शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक मान्यवर नाव ठरले आहेत.भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांचा सात्त्विक वारसा आणि धार्मिक संस्कार यांमुळे पंडित उमेश चौधरी यांना लहानपणापासूनच स्वरांची गोडी लागली. बाबांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदराने घेतले जाते आणि शेकडो शिष्य त्यांना गुरुस्थानी मानतात. या परंपरेशी साजेशी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि घराणेदार गायकीच्या रचनांचा अभ्यास करून नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. त्यामुळे पंडित उमेश चौधरी यांचे नाव शास्त्रीय संगीतामधील गंभीर, अभ्यासू आणि परंपरेला न्याय देणाऱ्या आघाडीच्या गायकांमध्ये घेतले जाते. त्यांच्या रियाजातून तयार झालेल्या सादरीकरणांमध्ये घराण्याची ठाम छाप तर दिसतेच, पण त्याचबरोबर स्वतःची व्यक्तिमत्त्वपूर्ण शैलीही स्पष्ट जाणवते. बंदिशींचे मंथन, रागातील बारकावे अधोरेखित करण्याची त्यांची पद्धत आणि श्रोत्यांशी निर्माण होणारी सहज संवादात्मक नाळ यामुळे त्यांचे संगीत आजच्या पिढीलाही प्रेरणा देते. महाराष्ट्राला सांस्कृतिक वरदान लाभलेले आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात येथील प्रज्ञावंतानी कर्त्वृत्वाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. अफाट सौंदर्याने भरलेले निसर्ग तसेच गंधर्वाच्या गोड गळयातील स्वरश्री देखील इथल्या गायक कलावंताना निसर्गत:च लाभली आहे. त्यातून असाच एक स्वरप्रेमी वारकरी सांप्रदयाची पताका, शास्त्रीय संगीताचा वारसा सांभाळत समाजकार्य करता करता सांगीतीक वाटचाल करणारे संगीत सुरमयी व्यक्तिमत्व म्हणजे नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील रांजणपाडा येथील रायगड भूषण पंडित उमेश चौधरी. शिक्षणात पदवीधर, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची ’विशारद’ पदवी, घेऊन पूर्ण केले. शास्त्रीय संगीताची आकाशवाणीची बी हाय ग्रेड, सुगम संगीताची बी ग्रेड, दूरदर्शनवर’योगियांचा देव’हया मालिकेचे संयोजन व पार्श्वगायन,सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष, पंडित भीमसेन जोशी गानगंधर्व पुरस्कार,रायगड भूषण, रायगड गौरव, अशी अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी त्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाले आहेत. शास्त्रीय गायनात स्वरमंडल (झंकार वाद्य) हे केवळ सुरेल साथीचे साधन नसून परंपरेशी, साधनेशी आणि गायनातील सूक्ष्मतेशी घट्ट निगडीत आहे. पंडित उमेश चौधरी यांना जगातील पहिले शुद्ध सोन्याचा मुलामा असलेले सुवर्ण स्वरमंडल यशवंत महाराज यांच्या हस्ते प्रदान झाले, हे त्यांच्या कलासाधनेचे आणि योगदानाचे मोठे गौरवचिन्ह आहे. अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान मिळाल्यामुळे या कार्यक्रमाचे ऐतिहासिक महत्त्व आणखीन वाढले आहे. ही केवळ पंडित उमेश चौधरी यांची वैयक्तिक गौरवकथा नसून संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेसाठीही एक अभिमानाचा क्षण ठरला आहे.
संगीत शास्त्रीय सिद्धांतानुसार गुरुंच्या मार्गदर्शनाखाली घराणेदार रचना पुनर्गठीत करून सादरीकरणाची भव्यता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न युवा पिढीपर्यंत पोहोचवणे म्हणजेच संगीतकलेचा खरा उत्कर्ष होय. अशीच संगीतसेवा व रागदारी संगीत कलेत स्वतःला अर्पण करण्याचे कार्य पं. उमेश चौधरी यांनी केले आहे. भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांच्या धार्मिक व सात्विक गुणांनी प्रेरित होऊन त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले. संगीत क्षेत्राला जबाबदारी मानून, बुवांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून पं. उमेश चौधरी यांनी गायनकलेतील प्रत्येक बारकावे आत्मसात केले. त्यामुळेच आज ते संपूर्ण भारतभर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करत आहेत. आकाशवाणीवर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करणारे वारकरी सांप्रदायातील रायगड जिल्ह्यातील ते एकमेव अद्वितीय आहेत. पं. चौधरींना “पंडित” ही उपाधी लाभली असली तरी ते स्वतःला आजही विद्यार्थी समजतात. नवनवीन शिकवण आत्मसात करण्याची वृत्ती, गुरुपरंपरेचे भान आणि संगीतकलेला वाहिलेली अखंड साधना या गुणांमुळे त्यांची गायकी देशाच्या कानाकोपऱ्यात आदराने स्वीकारली जात आहे.रसायनशास्त्राचे पदवीधर असलेले पं. उमेश चौधरी यांचा व्यावसायिक प्रवास उद्योगक्षेत्रातून सुरू झाला. परंतु अंतर्मनातील स्वरांचा शोध अखेरीस त्यांना संगीताच्या अथांग सागरात घेऊन गेला. २००३ मध्ये चेंबूर येथे झालेल्या अल्लादिया खाँ स्मृती समारंभात उस्ताद अस्लम हुसैन खान यांचे गायन ऐकून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तत्काळ त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देत त्यांनी पूर्णवेळ संगीतसाधना आणि गान प्रवास सुरू केला. आज पं. उमेश चौधरी आग्रा व जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रमुख वारसदार मानले जातात. संगीत म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजसेवेचे आणि आत्मशुद्धीचे एक प्रभावी साधन आहे, हे आपल्या कार्यातून ज्यांनी सिद्ध केले ते म्हणजे पं. उमेश चौधरी. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे त्यांनी १९२ तास अखंड भजन महोत्सव यशस्वीरीत्या आयोजित केला आणि त्या अद्वितीय उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. संगीत क्षेत्राला समाजजागृतीचे माध्यम मानत त्यांनी अवयवदान सारख्या महत्वाच्या विषयावर लोकसहभाग घडवून आणला. तसेच म्युझिक थेरपी सारख्या उपक्रमांद्वारे संगीताच्या आरोग्यदायी अंगाला अधोरेखित केले. त्यांचे भजन व शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सह्याद्री दूरदर्शनवर वारंवार प्रसारित होऊन असंख्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे या हेतूने त्यांनी मासिक सभा या उपक्रमाची सुरुवात केली आणि अनेकांना संधी उपलब्ध करून दिली. गुरुजनांचा आशिर्वाद, रसिकांचे प्रेमळ पाठबळ आणि शिष्यांना दिलेले प्रामाणिक मार्गदर्शन या त्रिसूत्रीमुळे पं. उमेश चौधरी हे खरे अर्थाने शास्त्रीय संगीताचे सेवक म्हणून ओळखले जातात.
“आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण स्वरांनी भारलेला राहो,
आरोग्य, आनंद आणि यशाचा मंगल गजर सतत घुमत राहो,
आपल्या कला-सेवेत अखंड ऊर्जा आणि प्रेरणा लाभो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” ——————— पं. शंकरराव गोडबोले




Be First to Comment