
रोहे (प्रतिनिधी)
स्वाध्याय शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड रोहा व गोडबोले नॅचरल्स अँड डेअरी फार्म्स एलएलपी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा येथील शेतकऱ्यांसाठी नेपियर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात येत आहे. पारंपारिक शेतीमधून मिळणाऱ्या अल्प उत्पादनामुळे अनेकांनी पारंपरिक शेती व्यवसाय सोडून रोजगाराची अन्य साधने शोधली आहेत. अशा वेळी नेपिअर सारख्या गवताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊर्जा पिकाचे उत्पादन घेण्याची नामी संधी प्राप्त होणार आहे.
निसर्गाचा समतोल, शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न असा दुहेरी फायदा साधला जाणार आहे. यासाठी प्राथमिक स्वरूपात पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात रोहा तालुक्यातील खारगाव, आरे खुर्द, आरे बुद्रुक, खारी, तारेघर, झोळांबे भातसई, शेणवई, वावे पोटगे, वावे खार येथे शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याचे स्वाध्याय शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड रोहा संचालक जितेंद्र जोशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पारंपरिक भात शेतीपेक्षा नेपियर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी आणि ‘ऊर्जा पीक’ शेतीचे भविष्य आणि त्याचे फायदे समजून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत सुधांशु गोडबोले व जितेंद्र जोशी यांनी दिली. पीक उर्जा शेती रोहा तालुक्यातील लहान शेतकऱ्यांसाठी एक सर्वात फायदेशीर कृषी उपक्रम ठरणार आहे. नेपियर गवत हे एक महत्त्वाचे ऊर्जा पीक असून या गवतातून कॉम्प्रेस्ड बायोगॅस, इथेनॉल, बायोमास पेलेट्स काढण्यासाठी उपयुक्त आहे. भारत सरकारने त्यांच्या जैवइंधन धोरणात जीवाश्म इंधनांची आयात कमी करण्यासाठी बायोसीएनजी उत्पादन लक्ष्य ठेवले आहे.जे शेतकरी या पिकाच्या लागवडीसाठी भूमिका बजावतील त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे सांगण्यात आले आहे.
रोहा येथे पहिल्यांदाच १५०० एकरवर क्लस्टर विकास आणि गट शेती प्रकल्प राबविण्यात येणार असून सदर संपूर्ण प्रकल्प सेंद्रिय पद्धतीने करण्यात येईल. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा म्हणून प्रति एकर दरवर्षी १५००० ते २०००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकणार आहे. या शिवाय ठिबक अनुदानाचे अप्रत्यक्ष फायदे, गट शेतीचे फायदे शेतकऱ्यांना मिळू शकतात.
नेपियरमधील शेतकऱ्यांचे उत्पादन स्वाध्याय एफपीसीच्या माध्यमातून गोडबोले नॅचरल्स अँड डेअरी फार्म्स एलएलपी (जी-नॅचरल्स) कडून खरेदी करणार आहे.जी नॅचरल्स ही भारत सरकारच्या डीआयपीपी द्वारे मान्यताप्राप्त ‘क्लीनटेक स्टार्टअप’ आहे. जी-नॅचरल्सला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून नेपियर गवत लागवडीसाठी आणि बायोसीएनजी उत्पादनासाठी नेपियर गवत पुरवण्यासाठी ‘इरादापत्र’ प्राप्त झाले आहे.यामुळे रोह्याच्या लहान भात उत्पादक शेतकऱ्यांनी पुढे येऊन शेतात नेपियर गवताची लागवड करणे आणि स्वतःच्या फायद्यासाठी गट शेती संस्कृती विकसित करणे आणि स्वच्छ ऊर्जा विकासात योगदान देणे खूप उपयुक्त होणार आहे.




Be First to Comment