
गणेशोत्सवात आरती, भजनाला लागणारी ढोलकी बाजारात दाखल
पनवेल दि. २२ ( वार्ताहर ) : गणेशोत्सवात आरती, भजनाला लागणारी ढोलकी बाजारात दाखल झाली आहे. शहाराच्या सुरुवातीलाच ठिकठिकाणी ढोलकी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे बाजारात ढोलकीचा नाद नानादू लागला आहे.
ढोलकी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने यंदा ढोलकीची किंमत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गणरायाचे आगमन २७ ऑगस्टपासून घरोघरी होणार आहे. पनवेल परिसरात ३० हजारा हून अधिक ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. काही ठिकाणी दीड दिवसाचे , पाच दिवसांचे, दहा दिवसांचे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यापार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील बाजारात गेल्या काही दिवसांपासून ढोलकी विक्रेत्यांनी आपली दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत.
मुंबई, ठाणेसह राजस्थान येथून सहकुटुंब ढोलकी विक्रेते दाखल झाले आहेत. लहान ढोलक्यांपासून मोठ्या आकाराच्या ढोलक्या तसेच जंबे तयार करण्यापासून त्या विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. पुठ्यांसह फणस, आंबा, शिसव आदी लाकडांपासून तयार केलेल्या ढोलक्या बाजारात उपलब्ध झाल्याचे पहावयास मिळत आहे. वेगवेगळ्या आकाराच्या ढोलक्या रु १५०० रुपयांपासून चार हजारांपर्यंत बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे ढोलकी तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत १५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे ढोलकीच्या किमतीमध्ये ५०० ते १००० रुपयांपर्यंत, तर पुठ्यांच्या ढोलकीच्या किमतीमध्ये १०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा ढोलकीच्या किमतीत १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यात वेगवेगळ्या आकाराचे जंबे २ हजार ५०० ते ५००० रुपये किंमत आहे.




Be First to Comment