

मूर्तिकारांच्या दळणवळणात सहकार्याची भूमिका बजावणार – पोलिस महानिरीक्षक संजय दराडे
पेण, दि. 21 (प्रतिनीधी) :- गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकारांची समन्वय बैठक पेण पालिकेच्या सभागृहात कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
यावेळी गणेशमूर्तीकारांना मार्गदर्शन करताना संजय दराडे यांनी गणेशमूर्तीकरांनी जी मूर्ती ट्रान्सपोर्ट करतानाची समस्या मांडली आहे त्यात पोलिस प्रशासन नक्कीच सहकार्याची भूमिका बजावणार आहे असे सांगितले. यावेळी रायगड पोलिस अधीक्षक आचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित फडतरे, विभागीय पोलिस अधीक्षक जालिंदर नालकुल, पोलिस निरीक्षक संदीप बागुल, पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे, पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे,पेणमधील गणेश मूर्तिकार, शांतता कमिटी सदस्य आणि पेणमधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
अवघ्या आठवडाभरावर गणेशोत्सव आला असल्याने आणि पेणमध्ये हजारो गणेशमूर्तिकार असल्याने त्या मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय दराडे पेण येथे आले होते. यावेळी कारखानदारांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करताना बाप्पाच्या मूर्ती पेणममधून इतरत्र दळणवळणाच्या माध्यमातून नेताना आपल्या गाडीला गणपतीची गाडी असल्याचा स्टिकर लावा, जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांना ती गणपतीची गाडी आहे असे समजेल आणि त्यांना सहकार्य करता येईल, त्याचप्रमाणे इतर व्यापाऱ्यांना देखील ट्रामपोर्टच्या बाबतीत अडचण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असे सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, आपण कारखानदारांनी जी जागेची समस्या मांडली आहे त्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी, पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांच्याशी योग्य तो पत्रव्यवहार करा त्यात तुम्हाला निश्चितच यश मिळेल, इतर शहरातील वाहतूक व्यवस्था चोखपणे पार पाडण्यासाठी आमचे पोलिस दल योग्य पद्धतीने जबाबदारी पार पडतील असे त्यांनी यावेळी सांगितले आणि यापुढे वर्षातून दोन वेळा गणपती कारखानदारांशी संवाद साधला जाईल असे आश्वासीत केले.यावेळी गणपती कारखानदार श्रीकांत देवधर, नितीन मोकल, मयुरेश चाचड, सागर पवार यांसह ॲड. मंगेश नेने, संतोष पाटील यांनी गणपती कारखानदारांच्या वतीने विविध समस्या मांडल्या.
आम्ही आज ज्या ट्रान्सपोर्टच्या वेळी येणाऱ्या अडचणी आणि जागेच्या अभावाबाबत समस्या मांडल्यानंतर पोलिस महानिरीक्षकांनी ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्हीच सर्व एकत्र येऊन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि पोलिस प्रशासनाने जो कारखानदारांच्या व्यवसायात त्यांच्या पद्धतीने सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
श्रीकांत देवधर, जेष्ठ गणेश मूर्तिकार




Be First to Comment