
पनवेल दि. २१ ( संजय कदम ) : गणेशोत्सवाचे आगमन आता अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे पनवेल परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. गणेशोत्सवासाठी पनवेल , नवीन पनवेल , करंजाडे , कामोठे , खांदा वसाहत या भागांतील विविध गणेशोत्सव मंडळे तयारीला लागली आहेत. तर दुसरीकडे गणेशाचे आगमन व विसर्जन करतेवेळी गणेशभक्तांना तालात ठेका धरण्यास भाग पाडणारी ढोल-ताशा पथकांनी आपला सराव जोरात सुरू केल्याचे दिसून येत आहे.
पनवेल परिसरातील विविध उड्डाणपुलांखाली, मोकळ्या जागा, काही ठिकाणच्या मैदानात ही ढोल-ताशा पथके आपल्या सहकाऱ्यांसह सकाळ-संध्याकाळ येथे सराव करताना दिसत आहेत. ही पथके ढोल-ताशा, झांज यांचा एक विशिष्ट ताल धरण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून सराव करत आहेत. त्यासाठी काही पथकांना यंदा नवीन वाद्यसामग्री खरेदी केल्याचे पहायला मिळत असून, त्यातून ते पारंपरिक व आधुनिक तालांचा संगम साधण्याचा प्रयत्न करत आहेत.गणेशोत्सवात भव्य मिरवणुका, आगमन व विसर्जन सोहळ्यात ढोल-ताशांचा गजर महत्त्वाचा मानला जातो. ढोल-ताशांचा गजर नसेल तर गणरायाचे आगमन आणि विसर्जन काय कामाचे, असे सारी गणेश मंडळा मानतात. त्यामुळे सर्वोत्तम वादन करणाऱ्या ढोल-ताशा पथकांच्या शोधात गणेश मंडळ असतात. त्यांच्या कानावर आपल्या सरावाचा ठेका पडावा व गणरायाच्या आगमनाची व विसर्जनाची ऑर्डर आपल्याला मिळावी, यासाठी ही ढोल-ताशा पथके अधिकाधिक सराव करत असल्याचे वास्तव पनवेल परिसरात ठिकठिकाणी समोर येत आहे.
दरम्यान, त्यांच्या सरावाचा ताल कानावर पडू लागताच आजूबाजूचे नागरिकदेखील स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी तेथे गर्दी करताना पहायला मिळत आहेत. त्यामुळे या पथकांच्या उत्साहात भर पडत असून, ते अधिकाधिक चांगला सराव करताना दिसत आहेत.त्यातच अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आतापासूनच मंडपाची सजावट व परिसरात विद्युत रोषणाई करून गणेशोत्सवाचा आनंद लुटण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच सकाळ संध्याकाळी ढोल-ताशा पथकांच्या सरावाचा नाद नागरिकांच्या कानावर पडत असल्याने नवी मुंबई परिसरात यंदा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा होणार असल्याचे चित्र आहे.




Be First to Comment