Press "Enter" to skip to content

“वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा” विषयावर परिसंवाद !

अर्बन नक्षलवादाचे जनक काँग्रेसच ! – माधव भांडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते

पुणे – वर्ष १९४२ मध्ये मध्ये स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊ नये म्हणून साम्यवाद्यांनी इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती, याची नोंद इतिहासात आहे. अशा इंग्रजांच्या हस्तकांना सन्मान देण्याचे काम पंडित नेहरूंनी केले. बंगालमधील नक्षलवाद असो वा पंजाबमधील खलिस्तानी समस्या, काँग्रेसने कधीच त्यावर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही. आज देशासमोर उभ्या ठाकलेल्या अर्बन नक्षलवादाच्या समस्येचे खरे जनक हे काँग्रेसच आहेत, असे ठाम प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते श्री. माधव भांडारी यांनी केले. परिसंवादात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी प्रास्ताविक केले आणि सूत्रसंचालन श्री. चैतन तागडे यांनी केले.

पुणे येथील टिळक स्मारक मंदिर येथे १९ ऑगस्ट या दिवशी ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ च्या वतीने ‘वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात ‘असत्यमेव जयते’ आणि ‘डावी वाळवी’ या पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक अभिजित जोग, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट, लेखक-विचारवंत श्री. विक्रम भावे आणि श्री. ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रसाद काथे हे मान्यवर सहभागी झाले होते. पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून विविध क्षेत्रांतील अभ्यासू, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी असे १ हजारपेक्षा अधिक राष्ट्रभक्त नागरिक प्रचंड पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने या परिसंवादाला उपस्थित राहिले.

या वेळी श्री. सुनील घनवट म्हणाले की, अर्बन नक्षलवादाविरोधात लढण्यासाठी हिंदूंची स्वतःची इकोसिस्टीम उभी केली पाहिजे. साम्यवादी आर्थिक बळावर आक्रमण करतात. पुरस्कार परत केले पण मिळालेले पैसे ठेवले हे त्यांचे दुटप्पी धोरण आहे. त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन कृतीशील पावले उचलण्याची गरज आहे ! श्री. अभिजित जोग यांनी स्पष्ट केले की, साम्यवाद्यांचे प्रमुख शस्र म्हणजे समाजात सतत अराजक निर्माण करणे. गरीब-श्रीमंत, स्री-पुरुष यांच्यात संघर्ष उभा करणे व भारतीय संस्कृतीवर वारंवार हल्ले करणे हे त्यांचे तंत्र आहे. त्यामुळे या लढ्याला वैचारिक स्तरावर उत्तर देणे आवश्यक आहे. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी अधोरेखित केले की, व्यवस्थेची मानसिकता बदलल्याशिवाय नवीन कायद्यांचा उपयोग मर्यादित राहतो. हिंदूंनी प्रत्येक कार्यात ईश्‍वरी अधिष्ठान ठेवले पाहिजे. तसेच जनसुरक्षा कायद्याला अधिक कडक आणि व्यापक स्वरूप देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. श्री. विक्रम भावे यांनी अनुभव मांडताना सांगितले की, कारागृहात असताना मी प्रत्यक्ष पाहिले आहे, की शहरी नक्षलवादी कैद्यांच्या मनात भारतीय संस्कृतीविषयी विष पेरत होते. त्यामुळे या संघर्षात प्रत्येकाने हिंदू म्हणून उभे राहिले पाहिजे.

परिसंवादचे सूत्रसंचालक श्री. प्रसाद काथे यांनी आवाहन केले की, हिंदु संस्कृतीला पर्याय नाही. इतर पंथांना त्यांचे देश आहेत; पण हिंदूंना भारताशिवाय दुसरा आधार नाही. आपल्या पूर्वजांनी खस्ता खाल्ल्या आहेत; त्यामुळे आता आपल्यालाच सजग व्हावे लागेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.