
मनोज पाटील (कळंबोली)
सहल म्हटल की थोरामोठ्यांना आवडणारा विषय. मात्र सन १९९५/९६ या शैक्षणिक वर्षात अध्ययन करणाऱ्या मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मुरबाड तालुक्यातील थुबे फार्म वर तीन दिवसांची सहल आयोजित करून पन्नाशीनंतर जगण्याची एक नवीन उमेद व ऊर्जा प्राप्त करण्याचा मार्ग मिळवला.
तस पाहिले तर या महाविद्यालयाचे सन १९९५/९६ चे माजी विद्यार्थ गेली पाच वर्षे न चुकता सहल आयोजित करून जीवनात एक नवीन उत्साह निर्माण करत आहेत. या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला पनवेल तालुक्यातील उसाटणे ,कर्जत, शेगाव, डहाणू व त्या नंतर पावसाळी सहल थुबे फार्म वर आयोजित करून जीवनात एक आनंद मिळविला. या सहलीत नुसता आनंदच मिळविला नाही तर आनंदातून गुरूजनांचा सन्मान करून गुरूजनांच्या ऋणातून काही प्रमाणात उत्तराई होण्याचा छोटासा प्रयत्न केला.
सहलीच्या पहिल्या दिवशी थुबे फार्मवर सहभागी झालेल्या सर्व मंडळींनी संध्याकाळी एकत्र जमून मनोरंजनातून आनंद घेण्याच्या प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सर्व मित्रमंडळी सकाळी उठून ज्या महाविद्यालयात बी. एड्. चे शिक्षण घेतले होते त्या शिवळे येथील जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जाण्याच्या तयारीला लागली. महाविद्यालयाच्या प्रवासाला सुरुवात झाली, मनातील उत्साह आणि गतकाळातील आठवणी घेऊन सर्व मित्रमंडळी महाविद्यालयात पोहचली. महाविद्यालयातील परिसर, तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून प्रवासाचा क्षीण कधी निघून गेला ते कळले देखील नाही. तीस वर्षांपूर्वी वर्गात पहिल्या आलेल्या ललिता अहिरे हिचे फलकावरील नाव पाहताच सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
त्यानंतर गुरूजनांच्या सन्मानाची तयारी करण्याची लगबग सुरू झाली. एका एका गुरूजनांचा महाविद्यालयात प्रवेश हा सर्व मित्रमंडळींना आनंद देणारा होता. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अंकुश निंबाळकर, प्रा.उमाकांत देशमुख, प्रा.अनिल चुनडे, प्रा.सुभाष घोलप या मंडळींचा सन्मान करतांना मित्रमंडळींचे मन भरून येत होते. शाल,पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व मिठाई देवून गुरुजनांचा यथोचित सन्मान केला.
या वेळी मित्रमंडळींनी केलेले मनोगत तसेच गुरूजनांनी व्यक्त केलेले मनोगत ऐकताना त्यांच्या आयुष्यातील आनंददायी क्षण तसेच खडतर प्रसंग ऐकताना डोळ्यातून अश्रू आवरणे अशक्य होत होते. आपले सर्वच विद्यार्थी योग्य मार्गावर व यशस्वी झाल्याचे पाहून गुरुंनीही आपल्या मनोगतातून आनंद व्यक्त केला. कार्यक्रम संपल्यावर गुरूजनांसोबत थुबे फार्मवर केलेले सहभोजन आनंददायी ठरले. त्या नंतर संध्याकाळी धसई परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोरखगड व सिद्धगड परिसरात फिरून इतिहासाच्या गतकाळाला जावून त्या वेळची अनुभूती मिळविली.
त्यानंतर रात्रीचे सहभोजन झाल्यावर ललिता अहिरे हिने नियोजन केलेल्या मनोरंजक खेळांचा मनमुराद आनंद घेतला. शेवटी तिसरा दिवस परतीचा उजाडला. सकाळी निसर्गरम्य फार्म वर फेरफटका मारून सकाळचा अल्पोपहार करून स्विमिंग पूल मध्ये मनमुराद आनंद घेतला. त्यानंतर दुपारचे सहभोजन करून आपापल्या घरी परतीच्या प्रवासाला निघताना , सुनील घुले यांच्या ये जिंदगी मिले ना दोबारा* या गाण्याने सर्वांचे डोळे पाणावले. वर्षा सहलीचा आनंद मनात साठवत सर्व मित्रमंडळी रात्रीपर्यंत आपापल्या घरी सुखरूप पोहचल्याचे निरोप येवू लागले.
या सहलीत तेजस्विनी कुलकर्णी, निषाद पवार, विभावरी कडू, केशव माळुंजकर, ललिता अहिरे, मनोज पाटील, नंदराम काळे, किरण पाटील, निलेश पिंपळे , भानुदास वडे, सुनील घुले, सुनील खतोडे ,छाया पाटील, जयवंत राऊत, रवींद्र पितांबरे, गोकुळ अहिरे, तात्यासाहेब दौंड सहभागी झाले होते. संगमनेर येथील आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे सुनील खतोडे यांनी सर्व मित्रमंडळींना आपल्या शेतातील कांद्याचा वानोळा दिला.




Be First to Comment