
रूप कुंड: एक हिमालयाच्या कुशीतील एक न उलगडलेलं रहस्य
हिमालयाच्या धूसर कुशीत, नंदा देवीच्या परिक्रमेत वर, गारठलेल्या वाऱ्यांनी श्वास रोखून धरलेल्या त्या उंचीवर एक छोटासा तलाव आहे, रूपकुंड. बर्फ वितळण्याच्या काही मोजक्या आठवड्यांत त्याचं पाणी काचेसारखं पारदर्शक होतं आणि तळाशी पडलेला काळकुट्ट इतिहास दिसू लागतो. मानवी हाडं, कवट्या, दंड, मांड्या. जणू पर्वतांनी स्वतःच लक्षात ठेवलेली एक सामूहिक स्मृती, ज्याला वेळ पुसून टाकू शकला नाही.
१९४२ मध्ये जंगल खात्याच्या रेंजरने ही सांगाड्यांची वस्ती पुन्हा पाहिली, आणि तेव्हापासून रूपकुंडच्या भोवती कथांचं वादळ उठलं. जपानी सैनिकांचे मृतदेह, राजकीय मोहिमा, तीर्थयात्रा, देवीचा कोप, आणि प्रचंड गारांनी ठेचून टाकलेली मंडळी. स्थानिक आख्यायिकेत तर एक राजा, त्याची राणी, आणि त्यांच्या ताफ्यावर देवीच्या रुष्ट नजरेने आकाशातून दगडाएवढ्या गारा पाडल्या. तलावाभोवती पडणाऱ्या कवटींवर आढळलेल्या गोलाकार खोल जखमांमुळे ही गोष्ट ऐकताना खोटी वाटत नाही. पूर्वीच्या तपासांमध्ये अशा भोवऱ्यासारख्या जखमांची नोंद झाली होती आणि “मुठीत मावेल अशी पण लोखंडाएवढी जड गार” ही शक्यता म्हणून मांडली गेली होती; तरी पुढची वर्षं या कथेला वेगळ्याच दिशेनं वळवतील, याची चाहूल त्यांनाही नसेल.
कारण अनेक दशकांनी विज्ञानानं या थरारक दृश्याकडे नव्या डोळ्यांनी पाहिलं.
रूपकुंडातील अस्थींच्या नमुन्यांवर प्राचीन डीएनए, कार्बन दिनांकन, आहाराच्या स्थिर समस्थानिकांचा अभ्यास, असं बहुविषयक काम झालं आणि २०१९ मध्ये त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले. परिणामांनी जुना, एकाच घटनेत मरण पावलेल्या “एकाच समुदायाचा ताफा” हा समज उलटा केला. तलावाभोवतीचे सांगाडे तीन वेगळ्या गटांत मोडतात, आणि त्यांचा मृत्यू एकाच काळात नाही, तर शेकडो वर्षांच्या अंतराने, भिन्न प्रसंगांत झाला. यात एक मोठा गट दक्षिण आशियाई वंशाचा, साधारण इ.स. ७वे–१०वे शतक; तर दुसरा, अगदी अनपेक्षित, पूर्व भूमध्य सागरी (ग्रीस-क्रेते परिसरासारखा) वंशाचा, इ.स. १७वे–१९वे शतक; तसेच एक-दोन व्यक्तींमध्ये आग्नेय आशियाई धागेही सूचित झाले. म्हणजे रूपकुंड हे एका प्रसंगाचं समाधीस्थान नाही; तो एक “द्वार” आहे. काळो-काळ वेगवेगळी प्रवास मंडळी, तीर्थयात्री, व्यापारी, साहसी, कदाचित राजकीय तांडे, ज्यांच्या जीवांना पर्वतांनी आपल्या कठोर नियमांनी रोखलं. या निष्कर्षांनी “सगळे कोकणातून आलेले ब्राह्मण यात्रेकरू” ही लोकप्रिय, पण पुराव्याविना पसरलेली कल्पना देखील डळमळली; दक्षिण आशियाई गटात काहींच्या जनुकीय नात्यांमध्ये पश्चिम-दक्षिण भारतीय वंशसदृश संकेत आढळू शकतात, पण “विशिष्ट कोकणस्थ/चिटपावन” अशा नेमक्या ओळखीला थेट वैज्ञानिक आधार नाही. कथा म्हणून ती रंगतदार, पण शास्त्रीय नोंदींमध्ये ती ठोस नाही. त्या भूमध्यसागरीय गटाच्या उपस्थितीने तर संपूर्ण कोडेच नव्याने मांडलं: इतक्या उंचीवर, त्या थंड, विरळ हवेत, समुद्रापारचे लोक कसे काय पोचले? तीर्थयात्रेचा आधुनिक काळातील कुठला तांडा? साहसी युरोपीय/लेव्हांटाईन प्रवासींची मोहीम? की एखादा व्यापारी-दलालांचा गट जो नंदा देवी राज जातच्या वाटांवरून गेला? शास्त्र त्यावर ठाम उत्तर देत नाही; पण रूपकुंडाची गूढता याच अनुत्तरित प्रश्नांतच तर आहे.
रूपकुंडकडे चढणं म्हणजे हवामानाशी करार करणं. धुके झपाट्यानं येतं, सूर्य दोन पावलं चालताच ढगांच्या मागे लपतो, आणि पायवाट कधी बर्फ, कधी दगड, कधी चिखल. जणू भूमी स्वतः तुमची परीक्षा घेत आहे. तलावापाशी पोहोचलात की शांततेचा असा नाद कानात भरतो की शब्दही समर्थन देत नाहीत. निळसर पाण्याच्या तळाशी, गवतांच्या सळसळीमध्ये, सूर्यकिरणांच्या लवलवत्या थरांखाली, मानवी अस्थी झोपलेल्या असतात. काही कवट्यांवरची दणकट, गोल खोलगट जखम अजूनही दिसते. त्या “गारकथे”ला एक दृश्य आधार देत. पण २०१९ च्या अभ्यासाने दाखवलं की सगळ्यांचा अंत गारांनी झाला, असं ठाम म्हणता येत नाही; काहींच्या हाडांवर सामूहिक आपत्तीची “एकसारखी जखम-छाप” दिसत नाही. म्हणजे एखाद्या काळात वादळानं एक ताफा संपवला असेल, तर कित्येक वर्षांनी दुसऱ्या कारणांनी दुसरा गट इथे मरण पावला असेल—हिमस्खलन? उंचीजन्य आजार? वाट चुकून थंडीने गोठणं? पर्वत उत्तरे देत नाही, फक्त संकेत देतो.
माणसांना कथा आवडतात. देवीचा कोप, राजाच्या राणीचा अपराध, ढोल-ताशांच्या नादात विसरलेली संयमाची मर्यादा आणि एखाद्या भल्या मोठ्या गारानं फोडलेल्या कवटीकडे पाहिलं की कथा खर्या वाटतात. पण विज्ञान जेव्हा हाडांच्या आतून बोलतं, तेव्हा कळतं की रूपकुंड हे एका जात, एका ठिकाण, एका घटनेचं स्मशान नाही; तो भटक्या नशिबांचा संगम आहे. इथे कधीतरी काशी-प्रयागहून आलेले भक्त थांबले असतील, तर शतकानंतर भूमध्येकडचे प्रवासीही या वाटेवर अडकले असतील. एकाच आकाशाखाली, एकाच खिंडीत, वेगवेगळ्या भाषा, पोशाख, खाद्यसंस्कार. पण अखेरीस तीच थंडी, तोच श्वास रोखणारा उंचपणा, आणि तीच चूक: पर्वताच्या गणिताशी विरोध.
रूपकुंडावर वर्षानुवर्षं विविध भारतीय संशोधक, पुरातत्त्वज्ञ, जनुकीय शास्त्रज्ञ काम करत आले. या अध्ययनांत भारतीय संस्थांचा मोठा वाटा आहे; पण चर्चेत सर्वाधिक उद्धृत झालेले निष्कर्ष २०१९ च्या बहुराष्ट्रीय पथकाचे आहेत. त्यानंतरही भारतीय माध्यमांत आणि प्रादेशिक मंडळांत “ते सगळे कोकणातून आले का?” “ब्राह्मण यात्रेकरू होते का?” अशा तर्कांचे उल्लेख दिसले; मात्र मूळ संशोधनपत्रांमध्ये ते दावे ठोसपणे सिद्ध झालेले नाहीत. काही पत्रकारितेकडून किंवा लोकप्रवादातून ते रंगवले गेले, एवढंच. खरी गोष्ट इतकीच की दक्षिण आशियाई, म्हणजे आपल्याच उपखंडातील एक जुना गट तिथे आहे; पण त्यांची “नक्की जात-उपजात-प्रांत” ओळख शास्त्र जपूनच मांडतं. त्यापलीकडचं काहीही हे कथाकथनाचं सुंदर, पण शंकेचं वस्त्र.
१९४२ साली ब्रिटिशकालीन जंगल अधिकाऱ्यांनी या सांगाड्यांची नोंद केली. सुरुवातीला अनेक अफवा उठल्या — काहींनी हे जपानी सैनिकांचे मृतदेह असल्याचं म्हटलं, तर काहींनी एखाद्या प्राचीन युद्धाचा पुरावा. पण स्थानिक लोकांकडे आधीपासूनच याबद्दलच्या लोककथा आणि राजकथा होत्या, ज्या पिढ्यान्पिढ्या सांगितल्या जात होत्या. जसे, एकेकाळी कनौजचा राजा जसधवल आणि त्याची राणी बलंपा नंदा देवीच्या यात्रेला निघाले. त्यांच्या सोबत मोठा ताफा, नोकर, नर्तिका, संगीतकार, आणि महागडे अलंकार होते. नंदा देवीच्या परिसरात अशा ऐषारामाला आणि गोंगाटाला मनाई होती, पण राजाने ती अट पाळली नाही.
लोककथेनुसार, देवी रुष्ट झाली आणि आकाशातून दगडाएवढ्या गारा पाडल्या. ताफ्यातील कोणीही वाचलं नाही. त्यांच्या कवट्यांवर आजही गोलसर खोल जखमा दिसतात, जणू आकाशातून कुणीतरी प्रहार केला आहे. आणखी एक प्रचलित कथा सांगते की, रूपकुंड तलावाच्या परिसरात सापडलेले काही सांगाडे महाराष्ट्रातील कोकणस्थ ब्राह्मण यात्रेकरूंचे असावेत. ही कथा म्हणते कोकणातून आलेला एक मोठा गट नंदा देवीच्या दर्शनासाठी निघाला. उंचीच्या प्रचंड थंडीला, विरळ हवेला, आणि बर्फाच्या गारपिटीला ते सामोरे जाऊ शकले नाहीत. अनेकजण वाटेत गोठून मृत्यूमुखी पडले, आणि त्यांचा अंतिम विसावा रूपकुंडच्या काठावर झाला.
शास्त्रीय तपासात हे निश्चित सिद्ध झालेलं नाही, पण स्थानिक गाइड आणि काही संशोधक अजूनही या गोष्टीचा उल्लेख करतात.
काही आख्यायिकांनुसार, प्राचीन काळात कुमाऊं आणि गढवाल प्रदेशातील राजांनी एकमेकांशी युद्ध केलं, आणि या तलावाजवळ शत्रू सैन्याचा मोठा गट बर्फात अडकून मृत्यूमुखी पडला.
दुसऱ्या कथेत एक राजपुत्र आणि त्याची बायको प्रेमासाठी घर सोडून इथे आले, पण उंचीच्या आजाराने आणि थंडीने ते वाचू शकले नाहीत. लोक म्हणतात, त्यांच्या आत्मा अजूनही इथे भटकतात.
पण, २०१९ साली झालेल्या आधुनिक तपासणीत शास्त्रज्ञांनी सांगाड्यांचे कार्बन डेटिंग आणि डीएनए विश्लेषण केले. निष्कर्ष चकित करणारे होते. काही सांगाडे इ.स. ७वे ते १०वे शतकातील दक्षिण आशियाई लोकांचे होते. तर काही सांगाडे १७वे ते १९वे शतकातील, आणि त्यांचा वंश भूमध्य सागरी (ग्रीक/क्रेट) परिसराशी जोडलेला होता. याचा अर्थ, हा तलाव एकाच घटनेचा साक्षीदार नाही, तर शतकानुशतकं वेगवेगळ्या काळात मृत्यू पावलेल्या लोकांचा अंतिम विसावा झाला आहे.
रूपकुंडच्या काठावर उभं राहून बर्फाच्छादित पर्वतांकडे पाहताना मनात एकच जाणवतं, पर्वत सुंदर आहेत, पण ते आपल्या नियमांचे आहेत. ज्यांनी त्यांचा आदर केला नाही, त्यांना ते क्षमा करत नाहीत.
राजा असो, यात्रेकरू असो, की परदेशी प्रवासी इथे निसर्गाने सर्वांना एकाच शांततेत सामावून घेतलं आहे.
रूपकुंड म्हणूनच मोहक आहे कारण तो उत्तर देत नाही; तो प्रश्न निर्माण करतो. तुम्ही तलावाच्या कडेला उभे राहा, वाऱ्यात देवदारांची सुस्कारा, दूरवर ढगांचा लोट, आणि पाण्याखाली काळ्या जमिनीवर चांदण्यासारखे चमकणारे हाडांचे तुकडे. कोणाची तरी पावलं काशीच्या घाटांवरून इथे आली असतील, कोणाचं जहाज भूमध्य सागरातून निघून आखाती बंदरांवर उतरलं असेल, कोणीतरी तांत्रिकाच्या माळेवर श्रद्धा धरून या पर्वताची परिक्रमा धरली असेल आणि शेवटी सर्वांची कथा या बर्फाळ काठावर येऊन स्थिरावली असेल. निसर्गाचं सौंदर्य जितकं अवर्णनीय, तितकाच त्याचा नियम कठोर. रूपकुंड हेच सांगतो: पर्वतांच्या पुस्तकात माणसाचं नाव लिहिलं जातं, पण शाई असते हिमवाऱ्याची आणि शेवटचा पूर्णविराम, शांततेचा.
– डॉ. गौरी साखरे, अमरावती.




Be First to Comment