


रामेश्वर कंट्रक्शनच्या माध्यमातून गतीमंद (दिव्यांग) मुलांसाठी दहीहंडी
पेण, ता. १६ (वार्ताहर) : देशभरामध्ये आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असताना पेण शहरातील रामेश्वर कंट्रक्शनचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते राजूशेठ पिचीका यांच्या माध्यमातून गतिमंद (दिव्यांग) मुलांसाठी लावण्यात आलेल्या दहीहंडीच्या उत्सवात त्यांनी आनंद साजरा केला.
पेणमधील आई डे केयर या संस्थेच्या बौद्धिक अक्षम गतीमंद (दिव्यांग) मुलांसाठी राजूशेठ पिचीका गेल्या १४ वर्षापासून हा अनोखा उपक्रम राबवत असून या माध्यमातून सदर मुलांना दहीहंडीचा आनंद घेता येत आहे.या दहीहंडी उत्सवामध्ये या संस्थेचे जवळपास ५० विद्यार्थी सहभाग घेतात आज सकाळपासूनच पावसाचा जोर असल्याने दहीहंडी फोडण्याचा आनंद त्यांच्यामध्ये द्विगुणीत झाला.
यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उद्योजक राजूशेठ पिचीका, प्रकाश झावरे, संस्थेच्या अध्यक्षा स्वाती मोहिते आदि उपस्थित होते.यावेळी राजूशेठ पिचीका म्हणाले की सदर मुलांच्या बौद्धिक क्षमता फार मोठी असून त्यांच्याकडील कलागुण पाहता एखाद्या उच्च शिक्षित मुलांना लाजवेल असं आहे यंदाच्या दहीहंडी उत्सवाला १४ वर्ष पूर्ण होत असून मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझ्यासाठी लाखमोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थितांच्या हस्ते प्रत्येक मुलांना भेटवस्तू देण्यात आली.




Be First to Comment