
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या मालमत्ता करावरील शास्ती माफी योजनेअंतर्गत देण्यात आलेली मुदत ३० (तीस) दिवसांनी वाढविण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिकेने शासनाच्या तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीचा विचार करून मालमत्ता करावरील शास्ती माफीचा निर्णय घेतला. हा निर्णय नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे. तथापि निर्णयानंतर काही व्यक्तींमार्फत चुकीचा व खोटा प्रचार तसेच संभ्रम निर्माण करणारी विधाने करण्यात आली ज्यामुळे अनेक नागरिकांची दिशाभूल झाली आहे. परिणामी अनेक नागरिक मालमत्ता कर भरण्याच्या देण्यात आलेल्या मुदतीचा लाभ घेऊ शकले नाहीत. त्यामुळे हि परिस्थिती लक्षात घेता शास्ती माफीची सद्य मुदत वाढविण्यात आल्यास उर्वरित नागरिकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल व महसूल वसुलीच्या दृष्टीनेही हा निर्णय हितकारक ठरेल. त्यामुळे सदर शास्ती माफीबाबत देण्यात आलेली मुदत ३० दिवस वाढविण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेकडे केली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील लावलेली शास्ती तातडीने अभय योजना लागू करुन रद्द करावी यासाठी भाजपच्यावतीने महानगरपालिकेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यात आली. याचा अनेक मालमत्ता धारकांनी लाभ घेतला. या काळात जवळपास २०० कोटीहुन अधिक रुपये कर भरून या योजनेचा लाभ मालमत्ता धारकांनी घेत उदंड प्रतिसाद दिला आहे.




Be First to Comment