
सिडकोकडून आश्वासन ; गव्हाण गावाला नवीन स्वतंत्र पाईपलाईन देण्याची जोरदार मागणी
पनवेल (प्रतिनिधी) गव्हाण गावाला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या मागणीवरून आज आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाला यश मिळाले. त्यानुसार आजपासून गावाला आवश्यक असलेला पाणी पुरवठा करण्याचे सिडकोच्यावतीने आश्वस्थ करण्यात आले आहे. तसेच या मोर्चाच्या अनुषंगाने गव्हाण गावाला हेटवणे पाणी पुरवठ्यातून नवीन स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात येण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून त्या संदर्भात येत्या पाच सहा दिवसात सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.
नवी मुंबई तसेच उलवे नोडचा विकास होत असताना त्यातील एक भाग असलेल्या गव्हाण गावात विविध समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटील होत चालला आहे, त्यामुळे प्रथम पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी गव्हाण ग्रामस्थांचा सिडको प्रशासनाविरोधात जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी सरपंच भाऊशेठ पाटील, माजी उपसरपंच विजय घरत, कोळी समाजाचे नेते विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, वसंत म्हात्रे, जयवंत देशमुख, अनंता ठाकूर, देशमुख समाज अध्यक्ष किरण देशमुख, आगरी समाज अध्यक्ष अशोक कडू, योगिता भगत, हेमंत पाटील, ऋषी कोळी, राजकिरण कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय येथून मोर्चाची सुरुवात होणार होती, त्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी एकत्रित झाले होते. यावेळी त्यांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गावाला दररोज जवळपास साडेतीन लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र पाणी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात सोडले जात असल्याने यॊग्य पुरवठा होत नाही. नियमित आणि मुबलक पाणी द्या अशी गर्जनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी गावातील महिलांची उपस्थिती मोठी आणि लक्षणीय अशी होती. दरम्यान मोर्चा मार्गस्थ होण्याआधी सिडकोचे सहाय्यक अभियंता त्या ठिकाणी हजर झाले होते तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने हे हि या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी यामध्ये मध्यस्थी केली. नियमित आणि मुबलक मिळत नसल्याच्या तक्रारीचा आवाज यावेळी घोंगावत होता. यावेळी सखोल चर्चा झाल्यानंतर गव्हाण गावाला मुबलक पाणी देण्याचे सिडकोकडून आश्वासन देण्यात आले. त्यानुसार आजपासून आवश्यक पाणी पुरवठा करण्याचे आश्वस्थ करण्यात आले. त्याचबरोबर यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी गव्हाण गावाला स्वतंत्र नवीन पाईपलाईन आणि ती हेटवणे पाणी पुरवठ्यातून मिळण्याची मागणी या मोर्चाच्या अनुषंगाने करण्यात आली. सर्वंकष चर्चा झाल्यानंतर येत्या पाच ते सहा दिवसात सर्वपक्षीय मंडळींच्या सोबतीने सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सूचित केले. त्यानुसार हि बैठक होऊन पिण्याच्या पाण्याचा कायम स्वरूपी मार्ग काढण्यात येणार आहे. त्यामुळे सदरचा मोर्चा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला. नियमित पाणी पुरवठा होणार असल्याने ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केले.




Be First to Comment