Press "Enter" to skip to content

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात खोपोली, खालापुर आणि अलिबाग येथील पोलीस-प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने

    रायगड – स्वातंत्र्यदिन साजरा करताना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. त्यात प्लास्टिकचे ध्वज वापरल्यास ते लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते. जे विक्रेते, नागरिक, संस्था,आस्थापने तसेच समूह राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस-प्रशासन तसेच शाळा, महाविद्यालयांत निवेदने देण्यात आली. सदर निवेदने देताना समितीच्या प्रतिनिधींसह राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला.

     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने खोपोली आणि खालापूर येथील पोलीस ठाण्यांत निवेदने देण्यात आली. याप्रमाणे खालापूर तहसीलदार कार्यालय, गटशिक्षण अधिकारी, शाळा आणि महाविद्यालय येथेही निवेदने देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती व्हावी यासाठी समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यातील अलिबागसह एकूण १६ शाळा, महाविद्यालयांत सुद्धा निवेदने देण्यात आली आहेत.

  प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी सुद्धा जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणारे, ‘ऑनलाईन’ पद्धतीने किंवा दुकानात आणि रस्त्यावर तिरंग्याच्या ‘मास्क’ची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी या मागण्या समितीच्या वतीने पोलीस-प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात केल्या आहेत. राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम गेली २२ वर्षे राबवत आहे. या अंतर्गत व्याख्याने, फलक प्रसिद्धी, भित्तीपत्रके, फ्लेक्स लावणे, सोशल मिडीया आदी माध्यमांतून प्रबोधन करणे, पडलेले राष्ट्रध्वज आढळल्यास ते गोळा करणे आदी कृती केल्या जातात. क्रांतिकारकांनी राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या प्राणाचे बलीदान दिले. त्यांच्या या बलीदानाचे स्मरण करून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य बजावावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.