
१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी सलग तिसऱ्यांदा ध्वजारोहण करण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनाच
उरण (घन:श्याम कडू) :रायगडच्या शासकीय ध्वजस्तंभावर पुन्हा एकदा आदिती तटकरेंचा झेंडा फडकणार आहे. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी सलग तिसऱ्यांदा ध्वजारोहण करण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना मिळाला आहे. महायुतीच्या सत्तेत असूनही शिवसेना शिंदे गटाचे व भाजपचे आमदार तोंड चोळत राहिले आणि एकमेव राष्ट्रवादी आमदाराने मान पटकावला.
रायगडच्या सात आमदारांपैकी तीन भाजपचे, तीन शिंदे गटाचे आणि एक राष्ट्रवादीचा असूनही प्रत्येकवेळी ध्वजारोहण तटकरे यांच्या नावावर! म्हणजे महायुतीत शिंदे गटाची ताकद फक्त पोस्टरपुरती आणि भाजपची झुकती नजर अजित पवारांच्या गोटाकडेच हे स्पष्ट.
राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळालं खरं, पण रायगडचं पालकमंत्रीपद त्यांच्या हातून तिसऱ्यांदा निसटणार आहे. या सततच्या अपमानामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत चीड उसळली असून, “आपल्याला सत्तेत असूनही हा अपमान का?” असा सवाल रस्त्यावर येऊ लागलाय.
ध्वजस्तंभावरचा मान तटकरे यांच्या झोळीत टाकत, महायुतीच्या अंतर्गत सत्ता समीकरणातला ‘रायगडी’ सत्य हा आहे. भाजपला शिंदेपेक्षा अजित पवारांच्या तटकरेंवर जास्त भरोसा आहे. रायगडच्या राजकीय नकाशावरचा हा संकेत पुढच्या निवडणुकीत कोणाचा झेंडा खरोखर उंचावेल, हे ठरवणार आहे.




Be First to Comment