
उरण(घन:श्याम कडू) “जय जय रामकृष्ण हरी… जय जय रामकृष्ण हरी…” टाळ-मृदंगाचा कडकडाट, भगव्या पताकांच्या लाटा आणि विठ्ठल नामाचा अखंड महासागर भेंडखळ गावाने यंदा श्री हरिनाम सप्ताहाच्या अविस्मरणीय १५७ वर्षांच्या परंपरेचा भक्तीमय जल्लोषात उत्सव साजरा केला जात आहे.
श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून गोपाळकाळ्यापर्यंत गावातील प्रत्येक गल्लीत हरिनामाचा गजर घुमला. टाळ, मृदुंग, वीणा, अभंगवाणी आणि दिंडी मिरवणुकींनी भक्तीरसाचा महापूर उसळवला. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठ्ठलाच्या कृपेने गावकऱ्यांनी पूर्वजांच्या अखंड वारशाची दिव्य परंपरा तशीच टिकवली आहे.
कृष्णजन्माष्टमीच्या रात्री मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला. श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या मंगल क्षणी दहीहांडीच्या जल्लोषाने सोहळ्याने शिखर गाठले. वृद्ध ते तरुण अशा सर्व सप्तकऱ्यांनी कृष्णभक्तीच्या लाटेत स्वतःला झोकून देत असतात.
या भक्तीसोहळ्याचे सर्व नियोजन व यशस्वी पार पाडण्याचे श्रेय श्री. काशीनाथ शिवराम ठाकूर, श्री. अशोक शंकर भोईर, श्री. उद्धव नामदेव घरत आणि श्री. गोपाळ जनार्दन ठाकूर यांना जाते. ज्येष्ठांचे मार्गदर्शन, गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भाविकांची अखंड नामसाधना यामुळे सप्ताहाला भव्यता लाभली.
भाविकांच्या म्हणण्यानुसार, “हा सोहळा बघण्याचा नाही… अनुभवण्याचा आहे!” सप्ताह संपल्यावरही टाळ, मृदुंग, वीणेचा नाद कानात घुमत राहतो, आणि ओठांवर आपसूक तुकोबांचे अभंग येतात “हेचि दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा…”
भेंडखळकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिले पांडुरंगाच्या नावातच खरी ऊर्जा, खरी प्रेरणा, आणि खरी महाराष्ट्राची ओळख आहे.





Be First to Comment