
उरण तालुक्यातील सोनारी गावचा सुपुत्र साईश कडू याची आयआयटी प्रवेशामध्ये ऐतिहासिक घोडदौड!
उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील सोनारी गावातील श्री. दिगंबर गंगाराम कडू आणि सौ. रजनी दिगंबर कडू यांचे सुपुत्र कुमार साईश दिगंबर कडू याने आयआयटी जेईई अॅडव्हान्स परीक्षा यशस्वीरित्या पार केली असून, संपूर्ण देशभरातून जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांमधून १३८१वा रँक पटकावला आहे.
त्याची निवड IIT – बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, वाराणसी येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेसाठी झाली असून, उरण तालुक्यातून आणि आगरी-कोळी समाजातून आयआयटीत प्रवेश मिळवणारा तो पहिला विद्यार्थी असल्याचे बोलले जात आहे.
साईशने शालेय जीवनातदेखील उल्लेखनीय यश संपादन केले असून, IES – JNP शाळेच्या वतीने त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. ४ थी आणि ८ वीत त्याने जिल्हा टॉप केला होता. शाळेच्या वतीने दोन वेळा १५ ऑगस्ट रोजी मुख्य पाहुणा म्हणून झेंडावंदन करण्याचा सन्मानही त्याला मिळाला होता.
साईशच्या यशाबद्दल कडू कुटुंबीयांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या दोन्ही बहिणींनीदेखील अभिमानास्पद शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगती केली आहे. मोठी बहीण कुमारी मिताली BE (Computer), IIM-MBA करून सध्या ICICI बँक, मुंबई मुख्य कार्यालयात चीफ मॅनेजर, तर दुसरी बहीण कुमारी मेघना BE (Electronics) करून सध्या रिलायन्स जिओमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. ती एक लोकप्रिय फूड ब्लॉगरदेखील आहे.
एकाच घरातून IIT आणि IIM सारख्या नामांकित संस्थांतून यश मिळवलेले विद्यार्थी असल्यामुळे कडू कुटुंबाची उरण तालुक्यातील एक प्रेरणादायी कुटुंब म्हणून ख्याती निर्माण झाली आहे.
साईशच्या यशाबद्दल अनेक सामाजिक संस्था, शाळा, शिक्षक, पालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाचा सत्कार करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.




Be First to Comment