Press "Enter" to skip to content

यूएफओ किंवा परग्रहवासीयांच्या उपस्थितीचे संकेत ?

“हेसडेलन लाईट” एक अज्ञात, रहस्यमय प्रकाशमालिका !

हेसडेलन लाईट (Hessdalen Lights) ही नॉर्वेमधील हेसडेलन खोऱ्यात दिसणारी एक अज्ञात, रहस्यमय प्रकाशमालिका आहे, जी गेली अनेक दशके वैज्ञानिकांपासून ते सामान्य पर्यटकांपर्यंत साऱ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरली आहे. या दिव्यांची नोंद 1930 च्या दशकापासून सुरू झाली असली तरी 1980 ते 1984 या कालावधीत ते विशेषतः अधिक प्रमाणात आणि सातत्याने दिसू लागले, ज्यामुळे ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनले. अनेक वेळा या प्रकाशांचे स्वरूप चमकदार पांढरट, पिवळसर किंवा लालसर प्रकाशगोलकाचे असते, जे कधी स्थिर राहतात तर कधी आकाशात भिरभिरताना, हालचाल करताना किंवा झपाट्याने वेगाने उडताना दिसतात. काही वेळा ते जमिनीपासून काही फूट उंचीवर तरंगताना तर काही वेळा आकाशात उंचावरून संपूर्ण खोऱ्यावरून फिरताना आढळले आहेत.

या रहस्यमय प्रकाशांबद्दल वेगवेगळ्या प्रकारची मते आहेत. काही लोक त्यांना यूएफओ किंवा परग्रहवासीयांच्या उपस्थितीचे संकेत मानतात, तर काही वैज्ञानिकांनी त्यामागे नैसर्गिक कारणे असल्याचा अंदाज वर्तवला आहे. काही संशोधकांच्या मते हेसडेलन खोऱ्यातील खडकांच्या रचनेत असलेल्या विविध धातूंमुळे, विशेषतः तांबे आणि लोह, भूगर्भीय हालचाली आणि आर्द्र हवामान यामुळे प्लाझा तयार होतो, ज्यामुळे हे प्रकाश निर्माण होतात. दुसऱ्या एका मते, हे प्रकाशदृश्ये भूमीखालील गॅस आणि आयनायझेशनमुळे होणाऱ्या विद्युत अभिक्रियांमुळे तयार होतात. मात्र या सिद्धांतांपैकी कोणतेही ठोस आणि संपूर्ण समाधानकारक उत्तर अजूनही मिळालेले नाही.

1983 मध्ये विज्ञान आणि संशोधन संस्था “Project Hessdalen” सुरू करण्यात आली ज्याचा उद्देश या घटनांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याचा होता. त्यांनी खोऱ्यात सतत निरीक्षण करणारी उपकरणं बसवली आणि अनेक वेळा हे दिवे त्यांच्या कॅमेऱ्यांमध्ये टिपले गेले. त्यानंतर देखील अनेक विद्यापीठे आणि संस्था यावर काम करत राहिल्या आणि काही प्रमाणात डेटा गोळा झाला, पण हे दिवे आजही एक अनुत्तरित कोडेच आहेत. 2007 मध्ये “EMBLA” नावाचा एक आणखी एक प्रकल्प सुरू झाला जो मुख्यत्वे इटालियन आणि नॉर्वेजियन वैज्ञानिकांच्या सहभागाने कार्यरत झाला. त्यांनी अनेक प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक, ऑप्टिकल आणि थर्मल मोजमाप यंत्रणांचा उपयोग करून निरीक्षण केलं आणि असे लक्षात आलं की हे दिवे केवळ प्रकाश नाहीत, तर त्यांच्यात ऊर्जेचं, हालचालीचं आणि कधीकधी भौतिक वस्तुस्वरूपाचं अस्तित्व असू शकतं.

हेसडेलन लाईट्सचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं अनियमित स्वरूप. काही दिवसांत ते वारंवार दिसतात तर काही वेळा महिन्यांसाठी गायब होतात. त्यामुळे हे नैसर्गिक, खगोलीय, भूगर्भीय, किंवा जैविक अशा कोणत्याही एकाच परिघात बसवणे कठीण झाले आहे. काही वेळा या प्रकाशांमध्ये अतिवेगाने हालचाल दिसून आलेली असून, ती माणसाच्या निर्मित कोणत्याही यंत्राद्वारे सहज साध्य होऊ शकत नाही. काही लोकांचा असा विश्वास आहे की ही एक “पृथ्वीची चेतना” असू शकते किंवा विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये घडणाऱ्या अतिसूक्ष्म घडामोडींचं प्रकट स्वरूप.

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहता, हेसडेलन लाईट्स हे एक मोठं आकर्षण बनलं आहे. नॉर्वे सरकार आणि स्थानिक प्रशासनाने त्या भागात पर्यटकांसाठी वेधशाळा, माहिती केंद्र, आणि मार्गदर्शक सेवा सुरू केल्या आहेत. अनेक डॉक्युमेंटरीज, पुस्तकं आणि शास्त्रीय लेखही या प्रकाशांवर आधारित आहेत. इतकंच नव्हे तर यावर आधारित अनेक विज्ञान कथा, चित्रपट, आणि टीव्ही मालिकाही तयार झाल्या आहेत. परंतु या सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आधुनिक विज्ञान आणि प्रगत उपकरणांच्या युगातही ही घटना आपल्या ज्ञानाच्या मर्यादा दर्शवते आणि आपल्याला आठवण करून देते की या विश्वात अजूनही असंख्य गूढ गोष्टी आहेत, ज्या मानवाने उलगडायच्या बाकी आहेत. हेसडेलन लाईट्स ही केवळ एक प्रकाशाची घटना नाही, तर ती एका गूढ, थक्क करणाऱ्या आणि अद्भुत अनुभवाची साक्ष देणारी गोष्ट आहे, जी मानवी कुतूहलाला सतत जागृत ठेवते.

  • – डॉ. गौरी साखरे, अमरावती ( लेखिका )
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.