
गर्भधारणेमुळे फुटले बिंग..मावशीसह दोन मुनींना अटक
आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता.
रिद्धपूर येथील सुरेंद्र तळेगावकर मठातील घटना
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी अविनाश गोंडाणे / सतिश वि.पाटील )
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर,जे महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखले जाते, तेथे एका मठातील सेवेकऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडवली आहे.
वर्षभर सुरू होता अत्याचार :
सुरेंद्रमुनी तळेगावकर महाराजांच्या मठात काम करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीवर सुरेंद्र मुनी आणि त्याचा साथीदार बाळकृष्ण देसाई यांनी गेल्या वर्षभरापासून अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलगी ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.
मावशीचीही गुन्ह्यात साथ :
शिरखेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे,आरोपींमध्ये पीडितेच्या मावशीचाही समावेश आहे.तिनेही या अत्याचारात आरोपींना मदत केली.अल्पवयीन मुलगी झोपेत असताना तिची मावशी तिला उठवून सुरेंद्र तळेगावकरच्या खोलीत घेऊन जात असे आणि तिथे तिच्यावर अत्याचार होत असे. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जात होती.

डॉक्टरांनी केला खुलासा :
पीडितेने याबाबत मावशीला सांगितल्यावर तिनेही हे गुपित ठेवण्यास सांगितले आणि मठातून बाहेर जाण्यास मनाई केली. दोन्ही आरोपींनी पीडितेवर वारंवार अत्याचार केले. एक दिवस मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर मावशीने तिला दवाखान्यात नेले. तिथे पीडितेने डॉक्टरांना सर्व प्रकार सांगितला. डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी मठातील बाबाविरुद्ध कठोर कारवाई केली.
पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल :
शिरखेड पोलिसांनी पोस्को (बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून सुरेंद्रमुनी तळेगावकर,बाळासाहेब देसाई आणि पीडितेच्या मावशीला अटक केली आहे.




Be First to Comment