Press "Enter" to skip to content

सुधागड विद्या संकुल कळंबोली येथे शिवजयंती उत्साहात

कळंबोली (मनोज पाटील )
सुधागड विद्या संकुल सेक्टर १ ई कळंबोली येथील सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेला शिवजयंती उत्सव ता. १९ ला विद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान संचालक तथा सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र बाजीराव पालवे हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते तर उपमुख्याध्यापिका अनिता पाटील , पर्यवेक्षक बाबुराव शिंदे , पर्यवेक्षिका पूनम कांबळे , कार्यालयीन अधिक्षिका बीना कडू , ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख संजय पाटील , माजी विद्यार्थी अजय सूर्यवंशी असे मान्यवर समारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

सरस्वती पूजन , दादासाहेब लिमये यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ प्राचार्य राजेंद्र पालवे हस्ते करण्यात आला. व्यासपीठाजवळ छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. माध्यमिक विभागाच्या संगीत शिक्षक वृंदांनी ईशस्तवन सदर केल्यानंतर सर्व मान्यवरांच्या व उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवरायांची आरती करण्यात आली.

उप मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. माध्यमिक विभागाच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख पद्धतीने नृत्य गीतातून व्यासपीठावर साकार केला. यावेळी विद्यार्थ्यांसह ज्युनियर कॉलेजच्या सुयेशा पाटील यांनी शिवगर्जना सादर केली.
बाबुराव शिंदे ,शरद देशमुख यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील निवडक प्रसंगांवर आधारित अभ्यासपूर्ण शिवव्याख्यान सादर करून उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शिवकाळातील इतिहासाची आवेशपूर्ण पद्धतीने नव्याने ओळख करून दिलीं .

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पालवे यांनी छत्रपती शिवरायांचा गौरव करताना म्हटले :- “शिवरायांच्या आठवणी सांगायला तास दीड तासांचा समारंभ अपुरा पडेल असे दैदिप्यमान कार्य शिवरायांनी ३५० वर्षांपूर्वी केलेले आहे. शिवरायांच्या तेजस्वी कार्याला इतक्या वर्षानंतरही तशीच झळाळी कायम आहे आणि राहणार ! शिवाजी महाराज यांचा जन्मच दैवी चमत्कार आहे. अशा महापुरुषांचे स्मरण भावी पिढीला अभ्यासक्रमातून करून देण्याचे महत्वाचे कार्य आपण शिक्षकांनी अशा समारंभातून प्रामाणिक पणाने करणे महत्वाचे आहे.” आजचा समारंभ अतिशय देखणा आणि नियोजन बद्ध केल्याबद्दल श्री. पालवे आपल्या अध्यक्षीय भाषणात समाधान व्यक्त केले.
ज्युनियर कॉलेज प्राध्यापिका शीतल शिंदे यांनी आभार प्रकटीकरण केले तर ज्युनियर कॉलेजच्या चारू तबकडे , माध्यमिक संगीत शिक्षिका रजनी पाटील व त्यांचे संगीत वृंद यांनी अतिशय भावपूर्ण सुरात पसायदान सादर करून समारंभाची सांगता करण्यात आली.
या समारंभाचे प्रभावी सूत्र संचालन माध्यमिक विभागाच्या सहशिक्षिका ऋजुला वाशीकर यांनी केले. ज्युनियर कॉलेज चे सर्व शिक्षक , सांस्कृतिक विभाग आणि माध्यमिक विभागातील सांस्कृतिक विभागाने या समारंभासाठी अथक परिश्रम घेतलेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.