
उरण : सुनिल ठाकूर : विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत व शारदाश्रम विद्यामंदिरच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित दोन अंकी ऐतिहासिक मराठी नाटक “शिवप्रताप” सादर करण्यात येणार आहे. हा नाट्यप्रयोग 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवाजी मंदिर सभागृहात रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हे नाटक ऐतिहासिक घडामोडींना नव्याने उजाळा देणार आहे. नाटकाच्या भव्य मंचीय सादरीकरणासह, शिवरायांच्या पराक्रमाचे चित्रण प्रभावीपणे मांडले जाणार आहे. या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर नाटकाचे निर्माते प्रवीण राणे असून या नाटकाचे दिग्दर्शन श्रुती लाड यांनी केले आहे.
शिवजयंती निमित्त शारदाश्रम विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देत विद्यार्थी शिवप्रताप नाटकांमध्ये भूमिका साकार करणार आहेत. शारदाश्रम विद्यामंदिर मराठी प्राथमिक शाळा ही 75 वर्ष जुनी शाळा असून विविध क्षेत्रांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून शाळेचा नावलौकिक वाढवलेला आहे. यंदा शाळा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. अमृत महोत्सवानिमित्त षण्मुखानंद सभागृहामध्ये शाळेचा भव्य असा सांस्कृतिक सोहळा झालेला आहे.

याच अमृत महोत्सवाच्या औचित्य साधून तसेच 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 45 महिलांनी ‘शिवप्रताप’ हे नाटक साकारलेले अनेक प्रयोग महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. या नाटकांमध्ये शारदाश्रम विद्यामंदिर मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अभिनयाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आदरांजली व्यक्त करणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता शिवाजी मंदिर येथे ‘शिवप्रताप’ हे नाटक सादर होत असून शारदाश्रम विद्यामंदिर मराठी प्राथमिक शाळेतील सर्व पालक व विद्यार्थी मराठी पारंपारिक वेशभूषेत नाटकाला उपस्थित राहणार आहेत बालोद्यान मराठी प्रायमरी व माध्यमिक विभागातील पालक व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तरी शिवजन्मोत्सवानिमित्त शिवाजी मंदिर दादर येथे होत असलेल्या शिवप्रताप या नाटकास अधिकाधिक पालक व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका दिप्ती इंदुलकर, संयोजक राजेंद्र घाडगे, कांचन खरात, विकास धात्रक यांनी केले आहे.




Be First to Comment