
धाटाव एमआयडीसीमध्ये उल्लेखनीय योगदान; पत्रकारिता आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंग क्षेत्रात स्वतःचा दबदबा
रोहा: प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी भागातील सुप्रसिद्ध समाजसेवक, पत्रकार आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर मारुती शांताराम फाटक यांची काँग्रेस पक्षाच्या पर्यावरण विभागाच्या रोहा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे.
मारुती फाटक हे धाटाव भागातील स्थानिक भूमीपत्र असून, अनेक वर्षांपासून समाजकार्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडत आहेत. त्यांनी स्वतः पत्रकारिता केली असून, समाजातील विविध समस्यांवर परखड लिखाण केले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ काँग्रेस पक्षाच्या पर्यावरण विभागाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मारुती फाटक हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी धाटाव एमआयडीसीमध्ये अनेक प्रकल्प पूर्ण केले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळाला आहे. धाटाव एमआयडीसीमध्ये त्यांनी केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. रोजगारनिर्मितीसाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक बेरोजगार तरुणांना स्थिरता मिळाली आहे.
पर्यावरण क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. औद्योगिक क्षेत्रात वाढ होत असताना पर्यावरण संतुलन राखणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर रोहा तालुक्यातील पर्यावरण विभागाच्या जबाबदारीचे दायित्व सोपवले आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यात उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.




Be First to Comment