Press "Enter" to skip to content

जलशुद्धीकरण केंद्राचे नामदार गोगावले यांनी केले लोकार्पण

खाडीपट्टा वासियांची पाणीपट्टी माफ करण्यासाठी करणार प्रयत्न ; कॅबिनेट मंत्री ना. भरतशेठ भरत गोगावले यांचे आश्वासन

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा सावंत आणि पाचकर यांनी घेतला खरपूस समाचार

महाड : रघुनाथ भागवत

खाडीपट्टा हा दुर्गम आणि ग्रामीण पट्टा असून येथील २१ गावातील नागरिकांना गेली तीन दशके खैरे धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र येथील नागरिकांकडून खैरे धरणाचे हे पाणी मोफत मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असून पाणीपट्टी माफ करण्यासाठी माझे प्रयत्न असतील असे कॅबिनेट मंत्री नामदार भरत गोगावले यांनी खाडीपट्टयातील खैरे येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खाडीपट्टा वासियांसमोर बोलताना आश्वासन दिले.

खैरे येथील जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण रविवारी नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते केल्यानंतर त्यांनी स्वतः तेथील स्वच्छ पाणी प्राशन केले. यावेळी रोहण येथे एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर नामदार भरत गोगावले यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता हेमंत नागदे, उपअभियंता प्रशांत पांढरपट्टे, नायब तहसीलदार भांबड, जल जीवन मिशन योजनेचे ठेकेदार रेडेकर, राजीप माजी सदस्य जितेंद्र सावंत, पंचायत समिती माजी उपसभापती शुहेब पाचकर, महाड तालुका संपर्क प्रमुख इक्बाल चांदले, महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकुम, विभाग प्रमुख कृष्णा सुकूम तसेच उद्योगपती सिताराम उभारे यांच्यासह खाडीपट्टा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या योजनेतील मुख्य जबाबदारी असणाऱ्या जिल्हा परिषद अधिकारी यांच्याकडून नागरिकांची पिळवणूक होत असून आजच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचा एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे सांगून यापूर्वी गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता, मात्र आजपासून सगळ्यांना स्वच्छ पाणी पुरवठा होईल. भविष्यात खैरे धरणातील गाळ काढण्यासाठी भरीव निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करेन असे देखील नामदार भरत गोगावले यांनी आश्वासन देऊन राष्ट्रीय महामार्गाचे काम देखील तत्परतेने सुरू आहे ते देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असा विश्वास त्यांनी उपस्थित शेकडो नागरिकांना यावेळी दिला.

सुरुवातीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उप अभियंता पांढरपट्टे यांनी या योजने संदर्भात माहिती देताना सदर योजनेचे काम प्रगतीपथावर असून तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्णत्वाकडे जाईल आणि त्यानंतर जिल्हा परिषदेकडे ही योजना वर्ग करण्यात येईल असे सांगितले. यावेळी राजिप माजी सदस्य जितेंद्र सावंत यांनी आपल्या तडाखेबाज भाषणामध्ये जलजीवन मिशनसाठी सहकार्य न करणाऱ्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. खाडीपट्टा वासियांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वारंवार पत्रकार रघुनाथ भागवत यांनी बातम्यांच्या माध्यमातून आवाज उठवला हे जरी खरे असले, तरी या योजने कामी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सातत्याचे अडचणी आणण्याचाच प्रयत्न केला आहे. यामुळे अशा निगरगट्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी असे कॅबिनेट मंत्री नामदार गोगावले यांच्याकडे त्यांनी मागणी केली.

पंचायत समिती माजी उपसभापती शुहेब पाचकर यांनी देखील या योजने अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी आपल्या तुफान फटकेबाज भाषणाला सुरुवात करून जल जीवन मिशनचे काम आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन देऊन सुमारे ३२ कोटी निधीची ही योजना नामदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्यासाठी मंजूर करून घेतली याबद्दल नामदार गोगावले यांचे आभार व्यक्त केले. जलशुद्धीकरण केंद्राचे आज लोकार्पण झाले असले, तरी ही योजना पुढे जिल्हा परिषद राबवणार असल्याने जिल्हा परिषदेचे देखभाल दुरुस्ती ठेकेदार यांचे या योजनेवर पूर्ण दुर्लक्ष झाले असून कोणतेही काम त्यांच्याकडून वेळेत होत नसल्यामुळे त्यांची तात्काळ हकलपट्टी करावी अशी नामदार गोगावले यांच्याकडे पाचकर यांनी मागणी केली. उपविभाग प्रमुख शितल विचारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.