Press "Enter" to skip to content

रोशन चाफेकर यांच्या पाठपुराव्याला यश

कालवा रोड वसाहतीच्या प्रलंबित घरप्रश्नाला वेग

रोहा : समीर बामुगडे

रोहा शहरातील कालवा रोड येथील १७ घरांचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकरणाला आता वेग आला असून, या समस्येच्या निवारणासाठी रोशन चाफेकर यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाची दखल घेतली गेली असून, प्रत्यक्ष मोजणीच्या दिशेने पावले उचलली जात आहेत.

खासदार तटकरे यांची भेट आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा
या प्रश्नाला गती देण्यासाठी १६ जानेवारी २०२५ रोजी रोशन चाफेकर यांनी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली व लेखी निवेदन सोपवले. त्यांच्या सूचनेनुसार पुढील स्तरांवर हालचाली सुरू झाल्या. १० फेब्रुवारी रोजी प्रांताधिकारी खुटवड, मुख्याधिकारी एडके आणि भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी संभाजी कांबळे यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

यानंतर १३ फेब्रुवारी रोजी उपअधीक्षक भूमिअभिलेख योगेश कातडे यांच्याशी पुन्हा बैठक घेण्यात आली. त्यांनी तातडीने १४ फेब्रुवारी रोजी या जागेची मोजणी करण्याचे आदेश दिले. ही प्रक्रिया इतकी वर्षे रखडलेली असताना, आता जलदगतीने होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

श्रेयवाद नाही, नागरिकांचे हित महत्त्वाचे” – रोशन चाफेकर
या प्रक्रियेत काही लोकांनी उशिरा लक्ष घालायला सुरुवात केली असली तरी प्रश्न सोडवण्याला महत्त्व आहे, श्रेयवादाला नाही, असे मत रोशन चाफेकर यांनी व्यक्त केले. “हे नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचे आणि त्यांच्या हक्काचे प्रश्न सोडवण्याचे काम आहे. जो कोणी हे प्रश्न सोडवेल, त्याचे स्वागतच आहे.”

कालवा रोडवरील १७ घरांच्या रहिवाशांनी चाफेकर यांच्या प्रस्तावाला लेखी पाठिंबा दिला असून, खासदार सुनिल तटकरे यांच्या सूचनेमुळे या प्रकरणाला अधिक बळ मिळाले आहे. याशिवाय, राज्यात महायुती सरकार आहे आणि रायगडमध्ये युतीचे खासदार व आमदार असल्याने आगामी काळात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास रोशन चाफेकर यांनी व्यक्त केला.

नागरिकांचा संघर्ष फळाला, समाधानाची भावना
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न धूळ खात पडला होता. मात्र आता याला वेग मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. “इतकी वर्षं आम्ही वाट पाहत होतो. आता प्रत्यक्ष कृती होत असल्याने आम्हाला आशा निर्माण झाली आहे,” अशी प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली.

रोशन चाफेकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे नागरिकांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे. येत्या काळात मोजणीच्या कार्यवाहीनंतर रहिवाशांच्या घरे अधिकृतरित्या नोंदवली जातील आणि त्यांच्या समस्या सुटतील, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.