
एक दोन जण गेल्याने पक्ष संपत नाही, शेतकरी कामगार पक्षाचे ठाम मतदार हीच आमची दौलत : शेकाप सरचिटणीस जयंत पाटील
खालापूर तालुका आणि खोपोली शहर कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगीतले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या जिल्हा चिटणीस या पदावर सुरेश खैरे यांची निवड केली. त्यांच्याच नेतृत्वाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात आयोजित केलेल्या संवाद मेळाव्याना उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असलेला मी जेव्हा पाहतो आहे तेंव्हा त्या निवडीला संपूर्ण जिल्ह्यानेही अनुमोदन दिल्याचे चित्र दिसत आहे. एक दोन लोक इकडे तिकडे गेले तरी शेतकरी कामगार पक्षाच्या मतांना कोणी हात लावू शकत नाही याची साक्ष खालापूर आणि खोपोलीकरांनी या मेळाव्याच्या निमित्ताने दाखवून दिली आहे. शेकापचे कार्यकर्ते जर अशाच पद्धतीने एकसंघ राहतील तर भविष्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. खोपोली शहरात बऱ्याच नागरी समस्या आहेत त्यांच्या सोडवणुकीसाठी गरीब कष्टकरी कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची आवश्यकता आहे. खालापूर तालुक्यातील अग्रगण्य असलेली खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अडचणीत असताना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आर्थिक स्वरूपाचे सहकार्य करून संस्थेला पुन:श्च ऊर्जा देण्याचे काम केल्याने आज संस्थेचा चेहरा मोहरा बदलला आहे. कधीकाळी शाळेच्या इमारतींना वर्षानुवर्षे रंग लावला जात नव्हता त्या इमारती नव्या दिमाखाने उभ्या राहिल्या आहेत. संस्थेने लॉ कॉलेज आणि सीबीएससी पॅटर्नवरची शाळा सुरू केली आहे, येणारे दिवसात संस्थेच्या माध्यमातून नर्सिंग कॉलेज काढण्याचा मनोदय आहे. या संस्थेची निर्मिती करताना कैलासवासी बी. एल. पाटील, गो. पू. तन्ना आणि तत्कालीन समाज सुधारकांचे मोठे योगदान होते त्याचे भान राखून संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करावा या दृष्टिकोनातून विश्वस्त मंडळाला सातत्याने मार्गदर्शन केले आहे, मात्र सध्या काही शुल्लक कारणावरून संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला कुठेतरी पत्रकारांनी आळा घातला पाहिजे. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना सहकार्य करणाऱ्या विश्वस्तांना त्याचे पुण्य मिळणार आहे किंबहुना व्यापारी वर्गाने या संस्थेच्या कारभारात लक्ष टाकल्याने भविष्यात संस्थेला आदर्श संस्था म्हणून गणले जाईल असा विश्वास वाटतो. खालापूर तालुका आणि खोपोली शहराचा झपाट्याने विकास होत आहे. सध्या स्थितीत असलेले उद्योग धंदे जोमात आहेत आणि नव्याने उद्योजक येथे आकर्षले जात आहेत अशा परिस्थितीत स्थानिकांना रोजगारासाठी संधी मिळावी कार्यकर्त्यांना कंत्राटे मिळावीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. सर्वत्र रहिवासी संकुलाचे निर्माण देखील प्रगतीपथावर आहे त्यामध्ये देखील रोजगारांची मोठी संधी आहे. महिला वर्गाला देखील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून वित्त आणि प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याकडे आपण भर देऊया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात देखील महिलांना प्राधान्य दिले जाईल. राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे महिला संघटनेची पुनर्बांधणी केली जाईल. युवक आणि नवनवीन कार्यकर्त्यांना देखील संघटनात्मक दृष्टीने काम करण्याची संधी जिल्हा चिटणीसांच्या माध्यमातून देण्यात येईल.

यावेळी नवनियुक्त रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी आपले विचार मांडले, महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा ऍड मानसी मात्रे यांनी परखड प्रमाणे आपले प्रतिपादन करत महिला संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे अभिवचन दिले. व्यासपीठावर जेष्ठ नेते जे एम म्हात्रे, माजी आम. बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, युवा नेते अतुल म्हात्रे आणि देवा पाटील त्याचप्रमाणे खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याच्या सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी प्रास्ताविक केले. युवा नेते रवींद्र रोकडे, खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, युवानेते कैलास गायकवाड, ज्येष्ठ नेते श्याम कांबळे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. नवनियुक्त जिल्हा चिटणीस सुरेश खैरे आणि देवन्हावे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच भूषण कडव यांचा गौरव करण्यात आला.
संवाद मेळाव्याच्या सुसज्ज आयोजनात खालापूर तालुक्यातून आणि खोपोली शहरातून शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती.




Be First to Comment