Press "Enter" to skip to content

सिंधुदुर्गातील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती!

हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय

भारत हे हिंदु राष्ट्र आहे; कारण या राष्ट्रात ९० टक्के हिंदू समाज आहे. राज्य आणि केंद्र सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी आहे. यापुढील प्रवासही मंदिरे व हिंदु समाज यांना भिती न बाळगता कार्य करता येईल. आपल्या भारतीय संस्कृतीचा मंदिर हा इतिहास आहे. जेव्हा इस्लामिक आक्रमक आले तेव्हा त्यांनी व्यक्ती किंवा संस्थानवर नाही तर मंदिरांवर हल्ले केले. भारताला मजबूत बनविणारी मंदिरे असल्याने इस्लामिक आक्रमकांनी प्रथम मंदिरांना लक्ष्य करून मंदिरे उद्धवस्त केली; मात्र यापुढे हिंदु राष्ट्र निर्मितीत मंदिरे महत्त्वाची भूमिका बजावतील. हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, तसेच  मंदिराच्या विरोधात विचार करण्याचीही हिंमत होणार नाही असे संघटन निर्माण करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी केले. ते सिंधुदुर्गातील माणगाव (कुडाळ) येथील श्रीदत्त मंदिराच्या सभागृहात महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती द्वारा आयोजित द्वितीय जिल्हास्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’त बोलत होते.

या अधिवेशनाचे उदघाटन श्रीदत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री. सुभाष भिसे, सचिव श्री. दीपक साधले, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सदगुरु सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट व मंदिर महासंघाचे कोअर टीमचे सदस्य श्री. अनुप जयस्वाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या वेळी पालकमंत्री श्री. नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. रणजीत देसाई, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सदगुरु स्वाती खाडये, माणगाव गावच्या सरपंच सौ. मनिषा भोसले आणि श्रीदत्त संस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवाराचे अध्यक्ष डॉ. वि.म. काळे यांचीही उपस्थिती होती. 

 प्रारंभी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी या मंदिर परिषदेच्या निमित्ताने पाठविलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. या वेळी मंदिर महासंघाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना काही मागण्याचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांसंदर्भात शासन स्तरावरून पाठपुरावा करून योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री श्री. नितेश राणे यांनी दिली. 

सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत हा लढा चालू ठेवणार ! – श्री. सुनील घनवट

सेक्युलर म्हणवणारी सरकारे मंदिरांना कोणताही निधी देत नाहीत, धर्माच्या संदर्भात कोणतेही साहाय्य किंवा कार्य करत नाहीत, तर मग त्यांना मंदिरे चालवण्याचा अधिकार कसा काय प्राप्त होतो ? हे सेक्युलर राजकारणी कोणतीही मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत. मग हिंदु मंदिरांच्या संदर्भातच हा दुजाभाव का ? सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत हा लढा चालू रहाणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक देवस्थानच्या जागा काही जणांच्या माध्यमातून बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकडे जिल्हा प्रशासन व पालकमंत्री नितेश राणे यांनी लक्ष घालून देवस्थानच्या जागा देवस्थानलाच मिळाव्यात यासाठी ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी केले.

मंदिरांच्या सरकारीकरणामुळे अनेक समस्या; मंदिरे ही उपासनेची केंद्र व्हावी ! – सदगुरू सत्यवान कदम

या वेळी सनातन संस्थेचे सदगुरू सत्यवान कदम म्हणाले की, भारतीय संस्कृतीची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याची स्त्रोत आहेत; परंतु आज आपण पाहतो मंदिरांचे सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृतीवर होणारे आघात वेळीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मंदिरे हे आपल्या हिंदूंची आधारशीला आहेत. मंदिरेही धर्मशिक्षणाची केंद्र बनले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आज धर्मशिक्षण नसल्यामुळे आपल्या मुली लव्ह जिहादला बळी पडत आहे. धर्मांतरण होत आहे. मंदिरातून लहानांसाठी बालसंस्कारवर्ग, किशोरांसाठी सुसंस्कारवर्ग, युवांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि मोठ्यांसाठी सत्संग चालू करणे आवश्यक आहे. मंदिरे ही उपासनेची केंद्र बनली पाहिजेत.

या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील यांनी म्हणाले की, वैयक्तिक जीवनाबरोबर सामाजिक जीवनात मंदिरांना विशेष महत्त्व आहे. मंदिरांमुळेच हिंदूंमध्ये धर्माचे अधिष्ठान निर्माण होते. या वेळी अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले. राज्यभरात अनेक तीर्थक्षेत्रे, पौराणिक मंदिरे, प्राचीन ऐतिहासिक मंदिरे, तसेच ग्रामदेवतांची, उपास्य देवतांची, ग्रहदेवतांची आणि संतांची समाधी मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराच्या समस्या भिन्न आहेत. त्यामुळे या सर्व मंदिरांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मंदिर महासंघाच्या माध्यमातून कार्य करण्याचे या वेळी ठरवण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.