Press "Enter" to skip to content

सुधागडमध्ये अवैध खैर तस्करीचा पर्दाफाश !

गुजरातचा व्यापारी गजाआड; वन विभागाची धडक कारवाई

प्रतिनिधी : समीर बामुगडे

पाली – सुधागड पाली परिसरात अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीचा मोठा कट उघड झाला आहे. वन विभागाच्या सतर्कतेमुळे अवैध खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या गुजरातच्या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणावर लाकूड आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई वन विभागाच्या धडक पथकाने केली असून, आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयास्पद वाहनाची गुप्त माहिती अन् मोठा सापळा !

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, खोपोली-पाली मार्गावरून मोठ्या प्रमाणावर जातं-खैर लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचा सुगावा लागला. तात्काळ कारवाई करत श्री दादासाहेब सोपान कुकडे (वनक्षेत्रपाल, सुधागड), श्री मनोज कृष्णा साळवी (वनपाल, मजरे जांभूळपाडा), श्री राजेश विलास दबडे (वनपाल, कळब), आणि श्री संदीप दिगंबर ठाकरे (वनरक्षक, ढोडसे) यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.

हा सापळा अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने रचला गेला. संशयास्पद वाहन GJ-15/AV.5783 हे मौजे पाली येथे आढळून आले. वाहनाची झडती घेतली असता, आत 687 नग सोललेले जातं-खैर लाकूड आढळून आले. ही संपूर्ण लाकूड तस्करी गुजरातहून चिपळूण व राजापूरमार्गे पुढे नेण्यात येत होती.

वन विभागाचा ‘सुपर पंच’ – व्यापाऱ्यासह मुद्देमाल जप्त
तपासानंतर वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे लाकूड लाखो रुपयांचे असून, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून त्याची काळाबाजारात विक्री करण्याचा कट होता. वन विभागाने या सगळ्याचा पर्दाफाश करत मोठी धडक कारवाई केली आहे.

गुजरातच्या व्यापाऱ्यास बेड्या – कोर्टाने सुनावली कोठडी
या प्रकरणात आरोपी अजगर हाफिज खान (तालुका वडोदा, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीवर भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

साहाय्यक उपवनसंरक्षक जावरे यांचे मार्गदर्शन – वन विभागाच्या कामगिरीचे कौतुक !
ही संपूर्ण कारवाई सहाय्यक उपवनसंरक्षक जावरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक उपवनसंरक्षक जावरे साहेब यांच्या नेतृत्वमध्ये होत आहे.

वनविभागाच्या अधिकऱ्याचं या दणदणीत कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, स्थानिक नागरिकांनी या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. अवैध लाकूडतस्करीच्या विरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा वन विभागाने दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.