माजी आमदार कै.दत्तू शेठ पाटील यांचे कनिष्ठ बंधू एडवोकेट नरेश नारायण पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते.माजी आमदार बाळाराम पाटील यांचे ते काका होते.२० जानेवारी रोजी त्यांनी नावडे येथील राहत्या घरी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती यशोदा, मुलगी गौरी आणि मुलगा वेदांत असा परिवार आहे.
अत्यंत हुशार,साहित्य प्रेमी आणि अध्यात्म लीन असे ऍड नरेश यांचे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.२९ तारखेला श्री क्षेत्र नाशिक येथे त्यांचा दशक्रिया पिंडदान कार्यक्रम पार पडला तर २ फेब्रुवारी रोजी नावडे येथे उत्तरकार्य म्हणजेच तेराव्याचे विधी होणार आहेत.
नरेश नारायण पाटील यांचे प्रारंभीचे शिक्षण नावडे येथील जीवन शिक्षण विद्या मंदिरात झाले. त्यानंतर पनवेलच्या विठोबा खंडाप्पा हायस्कूल मधून त्यांनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. रयत शिक्षण संस्थेने सुरू केलेल्या आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चे वर्ग पूर्वी सरस्वती विद्या मंदिर येथे भरत असत. नरेश पाटील यांनी येथेच महाविद्यालयीन शिक्षणाला प्रारंभ केला. त्यानंतर डोंबाळा येथील प्रशस्त वास्तू तयार झाल्यानंतर तिथल्या पहिल्या बॅच मधून नरेश पाटील इंटर झाले. पुढील उच्च महाविद्यालयीन शिक्षणाकरता नरेश पाटील यांनी मुंबईमधील रुईया महाविद्यालय मध्ये प्रवेश घेतला. तेथून तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र विषयामध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर तत्त्वज्ञान या विषयांमध्ये त्यांनी पदव्योत्तर शिक्षण घेतले.
त्यांचे बंधू ऍड गजानन पाटील यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मुंबई मधून कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. ज्येष्ठ बंधू गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकीली करण्यास सुरुवात केली. उमदे व्यक्तिमत्व,अभ्यासू बाणा, मुद्देसूद संवाद कौशल्य या जोरावर त्यांनी प्रथीतयश वकील म्हणून नाव कमावले. पनवेल उरण अलिबाग कोर्टांमध्ये गावठाण जमिनी, गुरचरण जमिनी, देवस्थान जमिनी मिळवून देण्याचे महोत्तम कार्य त्यांनी केले आहे.
मूळचा आध्यात्मिक पिंड असल्यामुळे कुटुंबात राजकीय वातावरण असून देखील ते राजकारणाकडे वळले नाहीत. अगदी जन्मापासूनच त्यांनी आळंदी आणि पंढरपूरच्या वाऱ्या नित्यनेमाने केला. नावड्याचे पुंडलिक शेठ यांच्यासोबत त्यांनी नावडे येथे युथ क्लब ची स्थापना केली होती. पुंडलिक शेठ, मेघनाथ कोळी, वसंत पाटील या सहकाऱ्यांसमवेत त्यांनी सनी क्रिकेट क्लब ची देखील स्थापना केली. एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची ख्याती होती.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे तत्त्वज्ञ,कोल्हापूरचे दत्ता बाळ यांना नरेश पाटील आपला आदर्श मानत. किंबहुना दत्ता बाळ यांचे नरेश पाटील हे पट्ट शिष्य होते. जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांच्या नंतर ज्यांनी प्रभावीपणे भारत देशाचे प्रतिनिधित्व केलं ते दत्ता बाळ यांच्याकडून नरेश पाटील यांना आवडत्या क्षेत्रातील गोष्टी शिकण्याची संधी मिळाली होती. कोकण एज्युकेशन सोसायटी मधील ब वा काळे सर, पाठक सर यांची योगी अरविंद, स्वामी स्वरूपानंद यांच्यावरील व्याख्याने नरेश पाटील आयोजित करत असत. नावड्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये होणाऱ्या या व्याख्यानांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असे.
नरेश पाटील यांना स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, स्वामी स्वरूपानंद यांचे साहित्य वाचण्याची आवड होती. ते स्वतः शास्त्रोक्त योग अभ्यासात पारंगत होते. सुमारे १९०८ मध्ये नावडे येथे उभारलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात तुकाराम महाराजांचे वंशज आनंद बुवा देऊकर यांचे दर हनुमान जयंती आणि कृष्ण जन्म या दिवशी किर्तन होत असे. नरेश पाटील यांना आनंद बुवा देउकर यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले.
वाचनाची प्रचंड आवड, दुर्मिळ साहित्य मिळविण्याचा छंद यामुळे त्यांचे निवासस्थान एखाद्या ग्रंथालयाप्रमाणे भासत असे.ऍड.नरेश पाटील यांचे व्यक्तिमत्व म्हणजे जणू कही चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Be First to Comment